अमरावतीत ‘सीएए’च्या समर्थनार्थ रॅली; बाजारपेठ बंद, हजारो नागरिक सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 06:02 PM2019-12-26T18:02:13+5:302019-12-26T18:02:39+5:30
रॅलीत १००० फूट लांबीचा तिरंगा युवकांनी आपल्या डोक्यावर उचलून धरला होता.
अमरावती : नागरिकत्व संशोधन कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ शहरात गुरुवारी सकाळी ११ वाजता महारॅली काढण्यात आली. यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते. लोकाधिकार मंचाच्यावतीने आयोजित या महारॅलीला दीडशेवर संघटनांचा पाठिंबा लाभला.
‘सीएए’ कायद्याच्या समर्थनार्थ नेहरू मैदानातून निघालेली रॅली राजकमल चौक, श्याम चौक, सरोज चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, रेल्वे स्टेशनमार्गे पुन्हा नेहरू मैदानात दाखल झाली. यामध्ये तिरंगा व भगवे झेंडे तसेच या कायद्याच्या समर्थनार्थ फलक घेऊन हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यामध्ये समर्थनार्थ गगनभेदी घोषणा देण्यात आल्यात. रॅलीत १००० फूट लांबीचा तिरंगा युवकांनी आपल्या डोक्यावर उचलून धरला होता. या रॅलीच्या निमित्ताने गुरुवारी दुपारपर्यंत बाजारपेठ बंद होती.
या रॅलीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपासून लोकाधिकार मंचाद्वारा नागरिक व सामाजिक संघटनांच्या भेटी घेऊन महारॅलीमागची भूमिका समजावून सांगण्यात आली. सोशल मीडियासह सर्वच मार्गांचा अवलंब करीत महारॅलीचा प्रसार व प्रचार करण्यात आला. या महारॅलीचा समारोप नेहरू मैदानात झाला. याचे रुपांतर जाहीर सभेत झाले. या महारॅलीमध्ये भारतीय जनता पक्ष, आरएसएस, भाजयुमो, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह दीडशेवर संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला व पुरुष नागरिक सहभागी झाले.
विरोधकांनी निर्माण केला संभ्रम - हसंराज अहीर
कुठल्याच नागरिकांच्या नागरिकत्वावर या कायद्याने परिणाम होणार नाही. मात्र, काँग्रेस व विरोधी पक्षांद्वारा नागरिकांमध्ये कायद्याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. किंबहुना देशात सद्यस्थितीत जो उद्रेक होत आहे, त्याला काँग्रेस पक्षच जबाबदार असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केला. यावेळी व्यासपीठावर महापौर चेतन गावंडे, मोहनदादा अमृते, कथाकार रामप्रिया, कल्लुजी सलुजा, राम हरकरे, अनिल साहू, भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रदेश प्रवक्ते, शिवराय कुळकर्णी, बादल कुळकर्णी यांच्यासह माजी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.