रमजान ईद घरी राहूनच साजरी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:13 AM2021-05-13T04:13:56+5:302021-05-13T04:13:56+5:30
अमरावती : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद घरी राहून व गर्दी टाळून साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल ...
अमरावती : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद घरी राहून व गर्दी टाळून साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी केले.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, अपर जिल्हा दंडाधिकारी नितीन व्यवहारे यांनी बुधवारी परिपत्रकही जारी केले आहे. त्यानुसार १३ एप्रिलपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ झाला. चंद्र दर्शनानुसार १३ किंवा १४ मे रोजी रमजान ईद (ईद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड साथीची अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदसाठी मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह, तसेच इफ्तारसाठी मशिदीत किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात साजरा करावा.
बॉक्स
असे आहेत शासन निर्देश
नमाज पठणासाठी मशिदीत, तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी स्टॉल लावू नयेत, नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या सूचना आहेत.