रमो रमा रे होळी, रो त्योहार होळी रमलो रे...

By admin | Published: March 24, 2016 12:32 AM2016-03-24T00:32:23+5:302016-03-24T00:32:23+5:30

बंजारा समाज आणि होळी यांचे अतुट नाते आहे. काळानुरुप सण साजरी करण्याची पध्दत सगळीकडेच बदलली असली ...

Ramo Rama Re Holi, Row festival Holi ramlo ray ... | रमो रमा रे होळी, रो त्योहार होळी रमलो रे...

रमो रमा रे होळी, रो त्योहार होळी रमलो रे...

Next

बंजारा तांड्यावर धूम : परंपरांची आजही होतेय जपणूक, ढोलकीच्या तालावर गीतांचा नाद
तिवसा : बंजारा समाज आणि होळी यांचे अतुट नाते आहे. काळानुरुप सण साजरी करण्याची पध्दत सगळीकडेच बदलली असली तरी बंजारा समाजाने मात्र अजूनही ही परंपरा जपली आहे. विशेष म्हणजे होळी आणि धुळवडीच्या सणानिमित्ताने बंजारा तांड्यांवर धूम सुरू झाली आहे.
बंजारा समाजात होळीला फार महत्त्व आहे. सणाची तयारी एक आठवड्यापासून सुरु होते. ‘रमो रमोरे होळी, रो त्योहार होळी रमलोर..’ अशी लेहंगी गीते दररोज गायली जातात. प्रत्येक तांड्यावर जगदंब देवीचे मंदिर असते. या मंदिरासमोर पारंपारिक लेहंगी गीते गायली जातात. लाठ्या-काठ्यांचे प्रात्याक्षिक दाखविले जाते. त्यानंतर तांड्याचा प्रमुख असणाऱ्या नायकाच्या घरासमोरही लाठ्या-काठ्यांचे प्रात्याक्षिक केले जाते.
रंगपंचमीला बंजारा तांड्यातील स्त्री-पुरुष, आबालवृध्द, गरीब-श्रीमंत एकत्र येऊन जल्लोष साजरा करतात. एकमेकांच्या अंगावर मनसोक्त रंग उडवून बंजारा बोलीभाषेतील खास धुळवडीची गीते गायली जातात. मद्य आणि मटणाचाच प्रामुख्याने बेत असतो. सामूहिक होळी साजरी करण्याची परंपरा बंजारा तांड्यांमधून आजही कायम असल्याचे दिसते.
अलिकडच्या काळात शहरात वास्तव्यास असणाऱ्या बंजारा बांधवांमध्ये सामूहिक परंतु पारंपारिक पद्धतीने होळी साजरी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, तांड्यावर राहणाऱ्या बांधवांमध्ये आजही ही प्रथा जपली जात आहे. होळी व धूळवड म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच आहे. बंजारा समाजात या उत्सवाची धूम सुरू झाली आहे. फगवा हा प्रकारही बंजारा समाजात बराच लोकप्रिय आहे. फगवा मागताना देखील विविध गीते गायली जातात. एकूण बंजारा समाजाची आगळी होळी साजरी होत आहे. (प्रतिनिधी)

रंग खेळा पण जरा जपून!
अमरावती : होळी उत्सवाला विजेच्या अपघाताचे गालबोट लागू नये, यासाठी होळी पेटविताना व रंग उडविताना होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. रंगपंचमी साजरी करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. २४ मार्च रोजी होलिकादहन पार पडल्यानंतर गुरूवारी रंगोत्सव साजरा केला जातो. मात्र, हा उत्सव मनसोक्त साजरा करताना विजवाहिनीच्या किंवा वितरण रोहित्र नसलेल्या ठिकाणी साजरा करावा. बरेचदा वीज प्रवाह असलेल्या ठिकाणी रंग उडविले जातात. अशावेळी पाण्याचे फवारे वीज वाहिनीवर उडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. रंगांचे फुगे फेकताना ते विद्युत खांब आणि वीज वाहिन्यांना लागणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असेही विद्युत विभागाने कळविले आहे. वितरण यंत्रणेचे रोहित्र व तत्सम उपकरणे असलेल्या जागेपासून लांब अंतरावर रंग उडवावेत. ओल्या हाताने विद्युत खांबाना स्पर्श करू नये, विजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. होळी व रंगपंचमीचा सण आनंदाचा आहे. त्यामुळे या आनंदात कोणतेही विघ्न येणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही विद्युत विभागाने केले आहे.

धुळवडीवर पोलीसांची नजर
अमरावती : धूलिवंदनाला कुठल्याही अप्रिय घटनचे गालबोट लागू नये, यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणांवर गस्तीवर भर दिला जाणार आहे. गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या धुळवडीवर पोलिसांची सूक्ष्म नजर असेल. रंगपंचमीला तरुणाईमध्ये मस्तीचा ज्वर उफाळतो. प्रसंगी मद्य रिचवून धूम स्टाईल बाईक पिटाळल्या जातात. रंग फासून शहरभर हुडदंग घातला जातो. त्यामुळे होळी, धूळवड साजरी करा, मात्र कायद्याच्या चौकटीत राहून, असे आवाहनच पोलिसांनी केले आहे.
४शहर पोलिसांनी होळी, रंगपंचमी व त्यापुढे शिवजयंतीसाठी कलम १४४/१ अन्वये आदेश काढले आहे.
कलम १८८ अन्वये कारवाई
४२३ मार्चपासून सकाळी ८ ते २८ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कलम १४४/१ अन्वये आदेश काढण्यात आला. आदेशांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी दंडसंहिता १८६० चे कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Ramo Rama Re Holi, Row festival Holi ramlo ray ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.