मेळघाटात अतिमद्यप्राशनाने रामटेकच्या दोन मजुरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 09:40 PM2018-07-23T21:40:05+5:302018-07-23T21:40:07+5:30
रायपूर व्याघ्र प्रकल्पाच्या कामावरील घटना : पोलिसांचा तपास सुरू
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत कर्मचाºयांच्या निवासाच्या कामासाठी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून आलेल्या दोन मजुरांचा सोमवारी सकाळी अतिमद्यपानाने मृत्यू झाला. तालुक्यातील रायपूर येथील या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अरविंद बापूराव वाकोडे (३८), नितेश सुखदेवराव टाकसाळे (२५ दोन्ही रा. महात्मा फुलेनगर, रामटेक, जि. नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. एक महिन्यापासून रामटेक येथील जवळपास आठ ते दहा मजूर शर्मा नामक कंत्राटदाराने घेतलेल्या व्याघ्र प्रकल्प कर्मचारी निवास निर्मितीच्या कामावर होते. रविवारी रात्री मजुरांनी रायपूर येथे अतिमद्यपान केले व खिचडीचे जेवण घेतले. सोमवारी सकाळी अरविंद व नितेशचा दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रथमदर्शी पुढे येत आहे. सदर घटनेची माहिती कंत्राटदार शर्मा यांनी पोलिसांत दिली. चिखलदराचे ठाणेदार आकाश शिंदे, सेमाडोह पोलीस चौकीचे सहायक उपनिरीक्षक सुधीर पोटे, पोलीस शिपाई पवन सातपुते यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. अतिदुर्गम रायपूर येथे संपर्कासाठी कुठलीच सुविधा नाही. त्यामुळे वृत्त लिहिस्तोवर अधिक माहिती मिळू शकली नाही.
विषारी दारू की खिचडी?
मजुरांनी रात्री यथेच्छ दारू ढोसल्याची माहिती असून, त्यानंतर खिचडीचे जेवण घेतले. आठपैकी दोनच मजुरांचा मृत्यू झाल्याने नेमका मृत्यू कशामुळे झाला, यामागे घातपात आहे का, हे शवविच्छेदन अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल. रायपूर येथे कुठल्याच प्रकारची देशी-विदेशी दारूचे दुकान नाही, तर मोहाची गावठी दारू मजुरांनी प्राशन केल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही मजुरांचे मृतदेह सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री उशिरापर्यंत आणण्याचे कार्य सुरू होते.
महिन्याभरापासून उपकेंद्र बंद
पावसाळ्यात मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा दावा दरवर्षीच फोल ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मेळघाटात बालमृत्यूचे प्रमाण वाढत असतानाही रायपूर येथील उपकेंद्र एका महिन्यापासून बंद असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड, भाजपचे महासचिव गोलू मुंडे यांनी केली आहे. आदिवासींसाठी आरोग्य विभाग सुविधा २४ तास फक्त असल्याचा कांगावा केला जात आहे. उपकेंद्रात कुणीच नसल्याने मजुरांना वेळेवर उपचारसुद्धा मिळू शकला नाही, हे विशेष.
उपाशीपोटी अतिमद्यपान केल्याने व्याघ्र प्रकल्पाच्या कामावरील दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास चिखलदरा ठाणेदार करीत असून, शवविच्छेदन अहवाल आल्यावर सर्व प्रकार स्पष्ट होईल.
विशाल नेहूल, उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी