पैसे संपले; १२ टँकर डिझेलअभावी उभे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:12 AM2021-05-14T04:12:28+5:302021-05-14T04:12:28+5:30
पान २ ची लिड स्टोरी चिखलदरा : अख्खा मेळघाट कोरोनाशी झगडत असताना तालुक्यातील दुर्गम गावांत पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला ...
पान २ ची लिड स्टोरी
चिखलदरा : अख्खा मेळघाट कोरोनाशी झगडत असताना तालुक्यातील दुर्गम गावांत पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. कोरोनाशी लढायचे की, पाणी आणण्यासाठी गाव सोडून अन्यत्र भटकंती करावी, असा यक्षप्रश्न मेळघाटवासीयांसमोर उभा ठाकला आहे. १२ टँकर डिझेलअभावी उभे असल्याने तालुक्यातील चार गावांवर हा बिकट प्रसंग ओढवला आहे.
पाण्याचा भीषण दुष्काळ असल्यामुळे लावण्यात आलेले टँकर चार दिवसांपासून डिझेलअभावी उभे आहेत. डिझेलसाठी संबंधित कंत्राटदाराला शासनाने पैसे न दिल्यामुळे आदिवासींची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. नदी-नाल्याच्या गढूळ पाण्यामुळे आजाराला आमंत्रण मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. चिखलदरा तालुका दरवर्षी पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळाला सामोरे जात आहे. तालुक्यात किमान २५ पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये टँकर लावण्यात येतात.
१२ गावांत टँकरवारी
१ फेब्रुवारीपासून टँकर लावण्याला सुरुवात झाली. आतापर्यंत मोथा, लवादा, तोरणवाडी, धरमडोह, बगदरी, बहादरपूर, मलकापूर, सोमवारखेडा अशा जवळपास बारा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मागील चार दिवसांपासून त्या टँकरमध्ये डिझेल टाकण्यासाठी पैसाच नसल्यामुळे हे सर्व टँकर उभे आहेत. कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना प्रशासनाच्या लालफितशाहीमुळे आदिवासींची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
बॉक्स
गतवर्षीचा पैसा मंजूर, यंदा ठेंगा
पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा करण्याचे कंत्राट ई-टेंडर पद्धतीने हैदराबाद येथील कंत्राटदाराला देण्यात आले. त्याने सातपुते नामक एक सब कॉन्ट्रॅक्टर ठेवला. या कंत्राटदाराला गतवर्षीचे पैसे आता मंजूर झाले. मात्र, अद्यापही मिळाले नाहीत. यंदाचा निधीच न आल्यामुळे आतापर्यंत त्याने जवळच्या पैशातून १२ गावांना पाणीपुरवठा केला. परंतु प्रशासन बेफिकीर असल्याने कंत्राटदाराने हात वर केले आणि पाणीपुरवठा बंद झाला आहे.
बॉक्स
रोगराईला आमंत्रण
चार दिवसांपासून या १२ गावांत पिण्याच्या पाण्याचे टँकर पोहोचले नाही. त्यामुळे आदिवासींची नदी नाल्यात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. अशात दूषित पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण सुरू आहे. यातूनच जलजन्य आजारांची लागण झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न शहापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबू हेकडे यांनी उपस्थित करत प्रशासनाला यासंदर्भात तक्रार केली आहे.
कोट
कंत्राटदाराला रक्कम न दिल्याने डिझेलअभावी टँकर उभे केले आहेत. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर माहिती देण्यात आली आहे. लवकरच तोडगा काढून टँकर सुरू होईल.
- नरेंद्र ठाकरे,
कनिष्ठ सहायक, पंचायत समिती चिखलदरा
कोट २
पाणीपुरवठा कंत्राटदाराची गतवर्षीची देयके बाकी आहेत. यासंदर्भात बीडीओंना सांगण्यात आले आहे. सोमवारपर्यंत देयके काढण्यात येईल. परंतु टँकर बंद न करता ते सुरू करण्याचे सांगण्यात आले आहे.
- माया माने,
तहसीलदार, चिखलदरा