रान राहिले दूर, शेतमजुरांचा फिटनेस हरवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:16 AM2021-08-13T04:16:35+5:302021-08-13T04:16:35+5:30
(शेतमजूर काम करताना फोटो टाकावा, ही विनंती) शेतमालकावर आर्थिक भुर्दंड, मजुरांचा प्रवासखर्च डोईजड गुरुकुंज (मोझरी) : कधीकाळी सूर्योदयापासून ...
(शेतमजूर काम करताना फोटो टाकावा, ही विनंती)
शेतमालकावर आर्थिक भुर्दंड, मजुरांचा प्रवासखर्च डोईजड
गुरुकुंज (मोझरी) : कधीकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेताच्या काळ्या कसदार जमिनीत भरघोस उत्पन्न घेण्यासाठी राबणाऱ्या शेतमजुरांचे हात आज घड्याळाच्या काट्याच्या वेळेत बांधले गेले. त्यातून शेतमजुरांचा फिटनेसही हरवला. त्याचा कमालीचा आर्थिक फटका शेतमालकांना बसत असून, दरवर्षी उत्पादन घेत असताना आर्थिक घडी विस्कळीत होत आहे.
भविष्यात शेतीव्यवसायात यांत्रिकीकरण व त्याचे अद्ययावतीकरण झाले आहे. शेतावर राबणारा मजूर हा कधीकाळी अतिशय कष्टीक वर्गात मोडला जात होता. शेतात मजुरीसाठी जाताना दररोज कित्येक किलोमीटर अंतर पायी चालत होता. त्यासाठी त्याचा कमालीचा फिटनेस दिसायचा. कामाबाबत कमालीची निष्ठा व गरज दिसून येत होती. कामाच्या वेळेचे नियोजन दिवसभर सूर्याच्या दिशानिर्देशानुसार चालायचे. त्यामुळे शिवारात अधिकाधिक काम निघत होते. मोबदलाही वाजवी घेतला जायचा. पण, सध्या परिस्थिती उलट झाली आहे. शासनाच्या विविध योजना शेतमजुरांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे त्यांनी शेतावर राबण्याच्या वेळा स्वमर्जीने अधोरेखित केल्या आहेत. त्यातच बदलत्या जीवनशैलीचा व खानपान पद्धतीचा फटका त्याच्या फिटनेसवर पडायच्या लागला. त्यामुळे शेतापर्यंत जाण्यासाठी आज विशेष वाहनांची सोय, पिण्यासाठी थंडगार कॅनचे पाणी उपलब्ध करून द्यावे लागते. त्यांच्या दिमतीला स्पेशल वाहन ठेवण्याची वेळ शेतमालकावर आली आहे. अन्यथा शेतमजूर कामावर येण्यास उत्सुक नाहीत. त्यातून मोठा आर्थिक सोस शेतकऱ्यांना सोसावा लागतो, हे विशेष.
------------------------------
मजूर टंचाईमुळे दरवर्षी पीक सवंगणीकरिता मेळघाटातून महिला, पुरुष, तरुण एक महिन्याच्या मजुरीसाठी परिसरात सहकुटुंब दाखल होतात. त्यांची बोलीभाषा कोरकू असल्याने ते स्थानिक व्यक्तीच्या संपर्कात राहून रोजगार मिळवतात. पण यात त्यांच्या श्रमाच्या मोबदल्यावर स्थानिक मध्यस्थ डल्ला मारतात. त्याची मिळकत कमाई कमी होते तरी ते गतीने रोज शेकडो एकरातील पिकांची सवंगणी करतात. भविष्यात त्याच मजुरांना पूर्णवेळ रोजगार शेतकरी उपलब्ध करून देऊ शकतात.
----------------------------------------------
शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची कारणे
पूर्वाश्रमीच्या शेतकरी कुटुंबातील महिला सदस्य रोज मजुरांच्या संगतीने शेतात प्रत्येक्ष राबत होती. आज याचा अभाव आहे. शेतमालक घरापासून शिवारापर्यंत प्रत्येक्षात उपस्थित असल्यामुळे कामचुकारपणा टाळता येत होता. कामाच्या ठिकाणी विशिष्ट वेळात किती काम निघायला पाहिजे. याचा अंदाज आधीच दिला जायचा. मजुरांच्या संगतीने घरातील महिला काम करत असल्याने तिच्या वेगाने इतरांना काम उरकते घ्यावे लागत असायचे. न्याहारीसुद्धा मजुरांच्या संगतीने होत असल्याने वेळकाढूपणा टाळता येतो. नियोजित वेळात काम अधिक होते.