"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 03:37 PM2024-10-19T15:37:43+5:302024-10-19T15:41:06+5:30

भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी आमदार रवी राणांवर टीका देखील केली आहे.

"Rana is not an MLA, but a moneylender", was the attack of BJP's Tushar Bharatiya on Ravi Rana | "राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल

"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल

अमरावती : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. जागावाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेतेमंडळी अनेक बैठका घेत आहेत. अशातच आता अमरावतीतीलबडनेरा विधानसभा मतदारसंघात आमदार रवी राणांच्या उमेदवारीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे रवी राणा यांच्या समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी आमदार रवी राणांवर टीका देखील केली आहे.

शुक्रवारी बडनेरा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याला तुषार भारतीय यांनी संबोधित केले, यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला. तुषार भारतीय म्हणाले की, आमदार रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघात कोणतंही विकास काम केलेलं नाही. बडनेरा मतदारसंघातील अनेक गावात पक्के रस्ते नाहीत. राजुरा, चिरोडी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील राणा सोडवू शकले नाहीत. अनेक गावांची अवस्था अतिशय खराब आहे. असं असताना आमदार रवी राणा यांनी आपल्या अनेक स्विय सहाय्यकांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून देण्याच्या नावाखाली पैसे खाल्लेत. पैसे खाऊन देखील अनेकांची कामं केली नाहीत. 

मतदार संघातील शासकीय जमिनी राणांनी हडपल्या. भातकुली येथील एमआयडीसीची जमीन गिळंकृत केली. राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत, अशी टीका तुषार भारतीय यांनी केली. तसेच, बडनेरा आणि अमरावती हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या दोन्ही मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गत साडेचार -पाच वर्षात प्रचंड मेहनत घेतली. आपली भूमिका ही कायम सेवेची होती आणि आहे. आता आपल्या भरोशावर निवडणूक लढण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना केवळ सत्ता हवी आहे. त्यांचा सेवेंशी कुठलाही संबंध नाही, असा आरोप देखील तुषार भारतीय यांनी केला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध होता, अखेर या विरोधामुळे नवनीत राणा यांचा पराभव झाला. अशातच आता नवनीत राणा यांचे पती बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना देखील भाजपने समर्थन देऊ नये अशी मागणी स्थानिक भाजप कार्यकर्ते व नेत्यांची आहे. त्यामुळे रवी राणा यांच्या समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. दरम्यान, अनेक वर्षांपासून भाजप बडनेरा मध्ये काम करत आहे. त्यामुळे उमेदवारी भाजपलाच मिळावी अशी मागणी तुषार भारतीय यांच्याकडून होत आहे. १०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी रवी राणा यांच्या विरोधात शिवसेनेच्या प्रिती बंड यांनी निवडणूक लढवली होती. त्यात रवी राणा यांनी बंड यांचा १५ हजार मतांनी पराभव केला होता.
 

Web Title: "Rana is not an MLA, but a moneylender", was the attack of BJP's Tushar Bharatiya on Ravi Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.