राणा म्हणतात, पटेलांना बच्चू कडूंनीच पाठविले शिदेसेनेत !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 11:07 AM2024-10-09T11:07:32+5:302024-10-09T11:07:59+5:30
गौप्यस्फोट : शिंदे-कडू यांच्यात राजकीय 'फिक्सिंग'चा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रहारचे मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल यांना शिवसेना शिंदे गटात पाठविण्याची खेळी बच्चू कडू यांचीच आहे. खरे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात राजकीय 'फिक्सिंग' असून महायुतीतून शिंदेसेनेने राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिल्यास आम्ही विरोधात काम करू, असा इशारा युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक तथा आमदार रवी राणा यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी धारणी येथे एका कार्यक्रमात आमदार राजकुमार पटेल हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर तोफ डागली. आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत महायुतीत आले. त्यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद भूषविताना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळविला. एवढेच नव्हे तर वाय प्लस सुरक्षादेखील मिळवली. असे असताना आमदार कडू यांनी कधीच महायुतीचा धर्म पाळला नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात काम केले, हे सर्वश्रुत आहे. म्हणूनच आमदार पटेल यांना शिंदेसेनेत पाठविणे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात राजकीय साटेलोटे आहे, असा आरोपही आमदार राणा यांनी केला.
मात्र, आमदार कडू आणि राजकुमार पटेल यांना कोणतीही खेळी करू द्या, त्यांचा येत्या विधानसभा निवडणुकीत हिशेब करणार, असा इशारा आमदार राणा यांनी दिला आहे. आमदार बच्चू कडू यांचे राजकारण म्हणजे 'बाप बड़ा ना भय्या, सबसे बडा रुपया' अशा प्रकारे आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे. याप्रकरणी बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर अमरावती जिल्ह्यात राजकीय धूमशान मोठ्या प्रमाणात सुरू असून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
म्हणूनच शिंदेसेनेत गेलो : राजकुमार पटेल
आ. बच्चू चू कडू कडू यांनी तिसरी आघाडी स्थापन केली. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाणार नाही, असे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान मला राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून पक्षात येण्याची ऑफर होती. मात्र, प्रत्यक्षात मी जेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांना भेटलो अन् तिसऱ्या आघाडीतून निवडणूक लढणार नाही, असे त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी लागलीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करा, अशी ऑफर दिली होती. तसेही मुख्यमंत्री शिंदे यांनी मेळघाटच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. त्यांच्याशी अगोदरपासूनच जवळीक होती. मुख्यमंत्री हे जिंदादिल माणूस असून त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आ. राजकुमार पटेल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.