राणा समर्थकांचा भाजप कार्यालयावर हल्ला
By admin | Published: April 16, 2016 11:59 PM2016-04-16T23:59:47+5:302016-04-16T23:59:47+5:30
‘पालकमंत्र्यांच्या बैलाला पो’ अशी तुफान नारेबाजी करीत राणा आणि समर्थक राजापेठ पोलीस ठाण्यातून बडनेरा मार्गाने कूच करीत असताना...
अमरावती : ‘पालकमंत्र्यांच्या बैलाला पो’ अशी तुफान नारेबाजी करीत राणा आणि समर्थक राजापेठ पोलीस ठाण्यातून बडनेरा मार्गाने कूच करीत असताना काही मीटर अंतरावरील भाजपच्या विभागीय कार्यालयावर राणा समर्थकांनी हल्ला केला. पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास हा हल्ला झाला, हे उल्लेखनीय. भाजप कार्यालयाबाहेर असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे फ्लेक्स राणा समर्थकांनी फाडून फेकले. कार्यालयाच्या तावदानांवर गोटमार केली, काचा फोडल्या. पुढे गद्रे चौकात या जमावाने एसटी बसच्या काचा फोडल्या.
आ. रवी राणा यांच्या समर्थकांनी दिलेल्या तक्रारीनुसार भाजपच्या सात पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा रात्री ११ वाजता राजापेठ पोलिसांनी नोंदविला. दिवसभर ठिय्या मांडून बसलेले आ. राणा त्यानंतर समर्थकांसह पोलीस ठाण्यातून रवाना झाले. त्यावेळी ही घटना घडली.
नारेबाजी करीत राणांच्या नेतृत्वातील हा जत्था राणा यांच्या निवासस्थानाकडे वळता झाला. घटना वाऱ्यासारखी पसरली. मध्यरात्रीपर्यंत मोठी गर्दी भाजप कार्यालयासमोर एकत्रित झाली. दिनेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हा जमाव राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला. कार्यालयावरील हल्ल्याची तक्रार मध्यरात्रीनंतर राजापेठ पोलिसात नोंदविली.
विवेक कलोती आयसीयूमध्ये
राणा यांच्या कार्यालयात शिरलेल्या भाजपजनांमध्ये विवेक कलोती या भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षांचा समावेश होता. राणा समर्थकांनी दिलेल्या हिंसक प्रत्त्युत्तरात कलोती यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. रात्री ११ च्या सुमारास कलोती यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष दक्षता विभागात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी त्यांचे बयाण नोंदविले. वृत्त लिहिस्तोवर ते आयसीयूमध्येच होते.
हा तर पोलिसांचा भ्याडपणा : राणा
भाजप पदाधिकाऱ्यांनी माझ्या कार्यालयात हल्ला केला त्यावेळी वर्दीतील पोलिसांना धक्काबुक्की केली. कॉलर पकडली. डिसीपी नितीन पवार, सीपी दत्तात्रेय मंडलिक यांना याबाबत मी अवगत केले. व्हिडिओदेखील उपलब्ध आहे. पोलिसांनी तरीही धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविले नाही. पोलीस भ्याड आहेत, अशी प्रतिक्रिया आ. राणा यांनी दिली.