रणरागिणींचा दणका, दारू दुकान बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:05 AM2018-03-09T00:05:31+5:302018-03-09T00:05:31+5:30
बडनेरा जुनीवस्ती बारीपुरा भागातील देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी ८ मार्च या जागतिक महिला दिनापासून सुरू केलेल्या आंदोलनाला यश आले असून गुरूवारपासून हे दुकान बंद करण्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : बडनेरा जुनीवस्ती बारीपुरा भागातील देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी ८ मार्च या जागतिक महिला दिनापासून सुरू केलेल्या आंदोलनाला यश आले असून गुरूवारपासून हे दुकान बंद करण्यात आले आहे. जागतिक महिलादिनी दारूचे दुकान बंद झाल्याने हा रणरागिणींचा विजय मानला जात आहे.
देशी दारूविक्रीचे दुकान या भागात नको म्हणून १० वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी आंदोलन शिगेला पोहोचले असताना हे दुकान हटविण्यासंदर्भात दुकान मालकाने पोलीस ठाण्यात सर्वांसमक्ष दोन महिने अवधी मागून तसे शपथपत्रावर लिहून दिले होते. शेकडो गावकरी यावेळी उपस्थित होते. त्यात अधिकांश महिला होत्या. मात्र, सहा महिने उलटूनही तो दारू विक्रीचे दुकान अन्यत्र हलवायला तयार नव्हता. दुकान मालकाकडून पोलीस ठाण्यात शपथपत्र घेणाºया पोलिसांनीही आता कानावर हात ठेवून तेही नामानिराळे झाले. परंतु हे दुकान हटवण्यासाठी चार दिवसांपूर्वी भाजपाचे नेते शिवराय कुळकर्णी यांनी पुढाकार घेतला. महिला शक्ती व सर्व राजकीय पक्षांच्या लोकांनी एकत्र येऊन या लढ्याला बळ दिले. अखेर दुकान मालकाला राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे शरणागती पत्करावी लागली. त्याने एक महिना हे दुकान बंद करून त्या काळात हेच दुकान स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्याआधारे संबंधित खात्याने तशा सूचना परवाना धारकाला दिल्या आहेत. महिलादिनी दारू दुकानांसमोर आंदोलन सुरू असतानाच हे पत्र येऊन धडकल्याने लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. फटाके फोडून, घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
प्रशासनाचे मानले आभार
ठिय्या आंदोलनात भाजपाचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर, नगरसेविका गंगा अंभोरे, दलितमित्र उत्तमराव भैसने, नगरसेवक इमरान खान, राजेंद्र दारोकार, संदीप अंबाडकर, छाया अंबाडकर, जयश्री मोरे, गुंफाबाई दरोळी, अलका अंबाडकर, किरण अंबाडकर, अरुण साकोरे, रंगराव गव्हाळे, मारोती पोकळे, प्रदीप पवित्रकार, सुनील चिरडे, विश्वास भगत, मोहन तायडे, नीलेश आजनकर, किशोर टारपे, बबन दारोकार, संतोष कुºहाडे सिंधू मतलाने, अंजली अंबाडकर, संगीता कुºहाडे, सुशीला गव्हाळे, कल्पना चरडे, सविता इखार, मंगला भुते, प्रिया भगत, शोभा आजनकर, गोपाल प्रधान, शिवा निंबर्ते, नितीन अंबाडकर, योगेश निमकर, बाळू ठवकर, मुकुंद कुळकर्णी, राजू सिंघई, श्याम नागपुरे, नाना आमलेसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी महिला उपस्थित होते. यावेळी शिवराय कुळकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अबकारी खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रवीण पोटे, भाजपा नेते आ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, एक्साईजचे अधीक्षक प्रमोद सोनोने, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांचे जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
शाळकरी विद्यार्थ्यांची रॅली
देशी दारू विक्री दुकानाचा सर्वाधिक त्रास असलेल्या गांधी प्राथमिक शाळेतील शेकडो चिमुरड्या विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थळी उपस्थिती दर्शवून तीव्र विरोध दर्शविला. दरम्यान विद्यार्थ्यांनी रॅली काढून दारुबंदीची हाक दिली. अखेर दुकान बंद झाल्याचे चिमुरड्यांना कळताच त्यांनी सुद्धा जल्लोष केला.
दारू विक्री परवाना धारकाने स्वत:हून दुकान बंद करण्याचे लिहून दिले आहे. स्थलांतरासाठी महिनाभराचा अवधी मागितला असून, यापूर्वीदेखील त्यांनी नागरिकांना बंद करण्यासाठी प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते. हे दुकान बंदसाठी महिलांनी अनेकदा मागणी केली आहे.
- प्रमोद सोनोने, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग