बडनेर्‍यात राणा यांची परीक्षा!

By admin | Published: June 9, 2014 11:20 PM2014-06-09T23:20:14+5:302014-06-09T23:20:14+5:30

सुलभाताई खोडके यांना अनपेक्षितपणे पराभूत केल्यानंतर चर्चेत आलेले आमदार रवी राणा यांच्या अस्तित्वाची लढाई बडनेरा विधानसभा मतदारसंघात यावेळी असणार आहे.

Rana's examination in Badnera! | बडनेर्‍यात राणा यांची परीक्षा!

बडनेर्‍यात राणा यांची परीक्षा!

Next

लढाई अस्तित्वाची : सुलभा खोडकेंना राजकीय पक्षांची निमंत्रणे
गणेश देशमुख - अमरावती
सुलभाताई  खोडके यांना अनपेक्षितपणे पराभूत केल्यानंतर चर्चेत आलेले आमदार रवी राणा यांच्या अस्तित्वाची लढाई बडनेरा विधानसभा मतदारसंघात यावेळी असणार आहे.
रवी राणा यांनी आमदारकी मिळविल्यावर या ना त्या कारणाने ते कायम चर्चेत राहिलेत. कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याऐवजी त्यांनी स्वत:च्या युवा स्वाभिमानी पक्षाचा पसारा जिल्हाभर कसा वाढविता येईल, याच  दृष्टीने कसोशीने प्रयत्न केलेत. त्यांच्या पक्षाने महापालिका निवडणूक लढविली. एकच नगरसेवक निवडून येऊ शकला असला तरी त्यांनी संख्येच्या गणितात न गुरफटता लोकसभा क्षेत्रासाठी पत्नी नवनीत यांना रिंगणात उतरविले. पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळवून देऊन जणू त्यांनी अशक्यप्राय बाब शक्य करून दाखविली. या बड्या यशानंतरही त्यांनी स्वत: मात्र युवा स्वाभिमानी पक्षाशी जुळून राहणेच पसंत केले. राजकीय यशपूर्तीसाठी राष्ट्रवादीचा त्यांनी शिताफीने वापर केला. राष्ट्रवादीशी ते एकरूप झाले नाहीत. अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेले रवी राणा यांनी अवघ्या पाच वर्षांत केलेल्या राजकीय उलथापालथी अचाट आहेत. त्यांच्या राजकीय शत्रुंची संख्याही त्यामुळेच वेगाने वाढली.
सुलभाताई खोडके आणि संजय खोडके यांनी हृदयाच्या गाभार्‍यात दैवतासम विराजमान असलेल्या शरद पवारांशी जी फारकत घेतली तीच मुळी राणा दाम्पत्याच्या कारणाने. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी राणा दाम्पत्य अवलंबित असलेले मार्ग अमरावती जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीसाठी धोकादायक ठरणारे आहेत. विधायक विचारधारा बाळगणार्‍या पवार कुटुंबातून अशा तत्त्वांना मुळीच बळ मिळू  नये, असा तात्त्विक आग्रह खोडके दाम्पत्याने शरद पवारांकडे धरला होता. पवारांनी या मुद्यावर खोडकेंच्या मताशी सहमती दर्शविल्यानंतरही अचानक नवनीत यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी बहाल करण्यात आली. रवी राणा हे सुलभाताईंकरवी सुरू असलेल्या विकास कामात खोडा घालतात. राष्ट्रवादीचे त्यामुळे खच्चीकरण होते, अशी तक्रार संजय खोडके, सुलभाताई खोडके यांची फार पूर्वीचीच. त्यानंतरही राष्ट्रवादीने राणा यांना बळ दिल्यावर राणा यांना रोखण्याची जबाबदारी आपण व्यक्तिगतरीत्या पार पाडू, असा निर्धारच खोडके दाम्पत्याने केला. राजकीय अस्तित्व त्यासाठी त्यांनी पणाला लावण्याची तयारी ठेवली; परंतु राणा दाम्पत्याशी जुळवून घेणे कदापि शक्य नाही, असे ठासून सांगितले. ही भूमिका ज्यांच्या जगण्याची तर्‍हा आहे, त्या खोडके दाम्पत्यावर मात करणे राणा यांच्यासमोरचे या निवडणुकीतील सर्वाधिक कडवे आव्हान आहे.
लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बडनेरा विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक कमी मते मिळाली. हा आकडा ४९ हजारांचा आहे. नवनीत यांना निवडून द्या असे रवी राणा यांनी केलेले कळकळीचे आवाहन त्यांच्याच मतदारसंघातील लोकांनी साफ अव्हेरले. करो या मरोच्या भावनेतून खोडकेंनी उभारलेली विरोधाची भिंत, इतर आमदारांची ओढवलेली नाराजी, मतदारांनी दिलेला नाखुशीचा कौल, सत्ताधारी पक्षाविरुद्ध सामान्यांची असलेली असंतोषाची भावना या सर्व अडथळ्यांवर यशस्वी मात करणे हीच खरी रवी राणा यांची परीक्षा ठरणार आहे.
सुलभाताई  खोडके यांनी पराभवानंतरही बडनेरा मतदारसंघात कायमस्वरुपी कार्य सुरू ठेवले. ऐन निवडणुकीच्या काळात वर्‍हाड विचार मंचाची स्थापना करून आश्‍चर्यकारक गर्दी  खेचणार्‍या सुलभाताई स्वसंघटनेच्या बॅनरखाली उभ्या राहतात की शिवसेना त्यांना स्वपक्षात सामील करवून घेऊ शकते, हा राजकीय डावपेचांचा विषय आहे.
शिवसेनेचे दिगंबर डहाके यांनी पाच वर्षांपूर्वी बडनेरा मतदारसंघात कार्य सुरू केले आहे. एकेकाळी तिवसा मतदारसंघावर दावेदारी करणारे संजय बंड हे देखील यावेळी बडनेर्‍यातून लढण्यास खासे उत्सुक आहेत. सामान्यांशी ते नाळ जोडून आहेत; तथापि पक्षादेश शिरसावंद्य मानणार्‍या शिवसैनिकांमध्ये डहाके अग्रस्थानी आहेत.
 

Web Title: Rana's examination in Badnera!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.