रानडुकरांनी केले मूग पीक फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 09:56 PM2018-08-28T21:56:24+5:302018-08-28T21:56:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ व कर्जाच्या डोंगरात सापडलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या पिकात रानडुकरांनी हैदोस माजवला आणि साडेतीन एकरातील मूग पीक फस्त केल्याने शेतकऱ्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे नव्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यानी केली आहे.
अनिल रामचंद्र थूल (रा. तिवसा) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे तिवसा हद्दीत अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गानजीक स्व. लालासाहेब महाविद्यालयाजवळ शेत आहे. अनिल थूल यांनी जून महिन्यात ३.५० एकरांत मुगाची पेरणी केली होती. यासाठी त्यांना ५५ हजार रुपये खर्च आला होता. १५दिवसात हे पीक घरात येणार होते. मात्र, त्याआधीच रात्रीच्या वेळेला डुकरांनी उभे मूग पीक फस्त केले. त्यामुळे शेतकºयांचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. या पिकाला शेतकऱ्यांनी तारेची कुंपणसुद्धा घातले होते. मात्र, हे तारेचे कुंपण रानडुकरांनी तोडून टाकले. तिवसा वनविभागाने या रानडुकरांसह प्राणी, वन्यजिवांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे.
आधीच कर्ज
सदर शेतकºयाकडे तिवसा स्टेट बँकेचे एक लाख रुपये व एचडीएफसी बँकेचे दोन लाख रुपयांचे कर्ज आहे. आता वन्यपशूंच्या हैदोसाने शेतकऱ्यावर नवे संकट उभे ठाकले आहे.
नुकसानभरपाईची मागणी
रानडुकरांनी मुगाचे संपूर्ण पीक जमीनदोस्त केले. पीक हाती येत नसल्याने शेतकऱ्याने रागाच्या भरात पिकावर ट्रॅक्टर फिरवला. यालंदर्भात नुकसानभरपाईची मागणी तिवसा वनविभागाकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे.
तिवसा तालुक्यात अनेक शिवारांमध्ये वन्यप्राण्यांचा हैदोस आहे. अलीकडच्या पावसामुळे तरारून आलेले पीक हे वन्यप्राणी फस्त करीत आहेत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे