महिलादिनी एकवटल्या रणरागिणी
By admin | Published: March 9, 2017 12:12 AM2017-03-09T00:12:31+5:302017-03-09T00:12:31+5:30
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने शहरात काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीमुळे महिला शक्ती एकत्र आली होती.
दुचाकी रॅली : शहरवासीयांचे वेधले लक्ष
अमरावती : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने शहरात काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीमुळे महिला शक्ती एकत्र आली होती. या रॅलीने दुचाकीवर फेटे घालून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
जागतिक महिला दिनाचे निमित्त महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस पुरस्कार, टीएचआर पाककृती स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, आदिवासी नृत्य, स्वर गुंजन अशा विविध कार्यक्रमांमुळे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या विविध उपक्रमांर्तगत जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील १४ अंगणवाडी प्रकल्पाच्यावतीने बालक आणि गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या आहाराच्या माध्यमातून पाककृती स्पर्धेत विविध प्रकारची पाककृती साकारण्यात आली होती. याशिवाय पुष्प प्रदर्शनी, मेळघाटातील आदिवासी महिलांनी सादर केलेले गादली आदिवासी नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, सीईओ किरण कुलकर्णी महिला व बालकल्याण सभापती वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, उषा गित्ते राजश्री कुलकर्णी, वनश्री वारे, ज्योसना ठाकरे यांच्यासह सदस्या संगीता सवई, रंजना उईके, संगीता चक्रे, वनमाला खडके, उपमुख्यकार्यकारी अधिकारी कैलाश घोडके आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी आदर्श अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुरस्काराने २८ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत गौरविण्यात आले. याशिवाय महिला बालकल्याण विभागाचे निवड बालविकास अधिकारील विस्तार अधिकारी आणि पर्यवेक्षिका यांचा उत्कृ ष्ट कार्याबद्दल उपस्थितांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डेप्युटी सीईओ कैलाश घोडके, तर संचालन क्षीप्रा मानकर हिने केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका सहभागी होत्या. (प्रतिनिधी)
आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्काराचे मानकरी
प्रिती इंगळे, बेबी तलवारे, हिरू पेठे, रंजना रौराळे, शेबनी राऊत, मेघा बनारसे, मालिनी इरखेडे, दीपाली पुसदकर, सुषमा चौकडे, रुपाली थोरात, संगीता बेंदरे, रत्नमाला नेवासकर, संध्या खातरकर, खातरकर, साधना ठोकळ, अर्चना सालोडे, शोभा पानसे, भारती धवे, विमल वसू, स्वाती लहाने, स्मिता पिसे, सरला शिंगणे, मिना अढावू, रंजना देशमुख, उज्वला वाठोडकर, मंदा जावरकर, भागीरथी आडे, शितल काळबांडे, सुकरई सावलकर यांचा समावेश आहे.
महिलांनी धरला ताल
जागतिक महिला दिनानिमित्त स्वर गुंजन कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित स्वर गुंजन कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि महिला कर्मचाऱ्यांनी मराठी गाण्यावर ताल धरत नाचण्याचा आनंदही व्दिगुणित केला.