मोझरी गणात काँग्रेसच्या रंजना पोजगे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 09:57 PM2017-08-21T21:57:54+5:302017-08-21T21:58:28+5:30
मोझरी पंचायत समिती गणाच्या रिक्तजागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रंजना सतीश पोजगे विजयी झाल्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : मोझरी पंचायत समिती गणाच्या रिक्तजागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रंजना सतीश पोजगे विजयी झाल्यात. त्यांना ३ हजार ८२७ मते मिळालीत. त्यांनी भाजपच्या अश्विनी सुनील बारबुद्धे यांना १ हजार ५३८ मतांनी पराजित केले. यानिवडणुकीसाठी तीन उमेदवार रिंगणात होते.
रविवारी या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली व अवघ्या ३० मिनिटांत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. गौरी संजय देशमुख या जि.प.निवडणुकीत निवडून आल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. काँग्रेसच्या विजयी उमेदवार रंजना पोजगे यांच्या पाठोपाठ भाजपच्या अश्विनी बारबुद्धे यांना २ हजार २८९ मते तर लढा संघटनेच्या स्वाती बेले यांना २ हजार १२९ मते मिळालीत. विशेष म्हणजे १२० मते ‘नोटा’ ठरली.
एकूण १५ केंद्रांवर झालेल्या मतदानात १४ हजार ८७५ मतदारांपैकी ८ हजार ३६५ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ५६.५७ टक्के होती. सोमवारी १० वाजता सुरू झालेली मतमोजणी शांततेत पार पडली. निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी इब्राहिम चौधरी व तहसीलदार राम लंके यांनी पाहिले. विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.
‘लढा’च्या वर्चस्वाला ‘तडा’
मोझरी पंचायत समिती गण काँग्रेसच्या स्थानिक आमदार यशोमती ठाकूर यांचा ‘होम सर्कल’ मानला जातो. मात्र, मागील १५ वर्षांपासून येथे काँगे्रस उमेदवारांचा पराभव होत होता. मागील काही वर्षांत लढा संघटनेचे संजय देशमुख यांचे वर्चस्व वाढले होते. मात्र, या पोटनिवडणुकीत लढा संघटनेचा उमेदवार तिसºया क्रमांकावर आल्याने त्यांच्या वर्चस्वाला तडा गेला आहे. तर काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे.