अडसुळांविरुद्ध खंडणी, कट रचण्याचे गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 01:18 AM2018-08-03T01:18:36+5:302018-08-03T01:19:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खंडणीची मागणी, अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, बदनामी करणे, गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे या आरोपांवरून राजापेठ पोलिसांनी खासदार आनंदराव अडसूळ आणि इतर तिघांविरुद्ध गुरुवारी विविध कलमान्वये फौजदारी गुन्हे नोंदविले. आ. रवि राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले.
नवनीत यांनी गुरुवारी पहाटे ३.२२ वाजता राजापेठ पोलिसात तक्रार नोंदविली. गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सकाळी पूर्णत्त्वास आली. आरोपींमध्ये अडसूळ यांच्याशिवाय त्यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव तसेच जयंत वंजारी आणि कार्तिक शहा यांचा समावेश आहे.
खासदारांचीच फूस
अमरावती : नोंदविण्यात आलेले गुन्हे अजामिनपात्र आहेत. दाखल करण्यात आलेल्या कलमा अशा- ३८५ (खंडणीची मागणी करणे), २९४ ( अश्लील शिवीगाळ), ५०६ ब (जीवे मारण्याची धमकी), ५०० बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणे), १२० ब (गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ च्या ३ (१)(१०), ३ (पी) (क्यू ). कलम २९४ व ५०६ कलम वगळता अन्य चारही कलमांमध्ये आरोपींना सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती पोलीस व विधिज्ञांनी दिली.
तक्रारीनुसार, खा. अडसूळ यांनी नवनीत कौर हरभजनसिंग कुंडलेस यांच्याविरुद्ध बांद्रा स्थित जात पडताळणी विभागात तक्रार नोंदविली होती. त्या तक्रारीचा नोव्हेंबर २०१७ मध्ये निकाल लागून नवनीत कौर यांचे जात वैधता प्रमाणपत्र सत्य ठरविण्यात आले. मात्र, हे प्रकरण सुरू असतानाच जयंत वंजारी यांनी या प्रकरणातील गोपनीय दस्तावेज समाजमाध्यमातून वारंवार प्रकाशित केले. या प्रकाराने आपली समाजात बदनामी झाली, चारित्र्यहनन झाले, असे नवनीत कौर यांनी म्हटले आहे. ही बदनामी थांबविण्यासाठी जयंत वंजारी यांनी आपले यजमान आ. रवि राणा यांना भ्रमणध्वनीसह प्रत्यक्षात भेटून १ कोटी रुपयानची मागणी केली. रकक्कम न दिल्यास समाजमाध्यमातून नवनीत कौर यांनी बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. याशिवाय वंजारी, शहा व भालेराव यांनी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधून अश्लील शिवीगाळ केली. तथा पती आ. राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नवनीत कौर यांनी म्हटले आहे. आरोपी सुनील भालेराव यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून अडसूळ यांच्याविरुद्ध निवडणूक लढविल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप नवनीत कौर यांनी केला आहे. जयंत वंजारी, कार्तिक शहा व सुनील भालेराव यांनी हे कृत्य खा.आनंदराव अडसूळ यांच्या सांगण्यावरून केल्याची बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
जात वैधता प्रमाणपत्र खरे ठरविण्यासाठी सन २०१३ ते २०१८ या कालावधीत ‘जातचोर’ आमदाराला अनेक प्रयत्न करावे लागत आहेत. नवनीत कौर यांचे वडील हरभजनसिंग कुंडलेस हे सन २००७ ते १ जानेवारी २०१८ या काळात परदेशात असतानासुद्धा नवनीत कौर यांनी त्यांच्या बनावट स्वाक्षरी करून अनेकदा गुन्हा केला आहे. त्यांच्या या खोटारडेपणाची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार नोंदविली आहे. त्यात आयोगाने कारवाईचे आदेश देताच आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी त्यांनी माझ्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्यात पोलिसांनी ब फायनल समरी न्यायालयात पाठविली. याहीप्रकरणी आम्ही न्यायालयात जाऊ.
- आनंदराव अडसूळ, खासदार
नवनीत राणा जिल्ह्याच्या स्नुषा आहेत. महिलेची बदनामी करणे ही अमरावतीकरांची संस्कृती नाही. तथापि, खा. अडसूळ यांनी निव्वळ आकसापोटी नवनीत राणांची बदनामी चालविली आहे. वंजारी, भालेराव व शहा यांनी एक कोटी रुपयांच्या केलेल्या मागणीचे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. नवनीत राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढू नये, यासाठी खा. अडसूळ कटकारस्थाने रचत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी माझ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली. अडसुळ आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या अनेक आरोपांपैकी एकही आरोप सिद्ध करून दाखविल्यास मी राजकीय सन्यास घेईन.
- रवी राणा, आमदार