तोतया पत्रकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा
By admin | Published: October 31, 2015 01:13 AM2015-10-31T01:13:03+5:302015-10-31T01:13:03+5:30
‘लोकमत’च्या नावाचा गैरवापर करून एका वाहतूक व्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास सुरू : ‘लोकमत’च्या नावाचा गैरवापर
अमरावती : ‘लोकमत’च्या नावाचा गैरवापर करून एका वाहतूक व्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकी सोडून पळ काढणाऱ्या त्या तोतयाचा शहर कोतवाली पोलिसांनी शोध चालविला आहे. जप्त केलेल्या दुचाकीच्या आधारावर पोलिसांना त्याचा शोध घेणे सोपे झाले आहे. हा प्रकार २९ आॅक्टोबर रोजी रात्री ८ च्या सुमारास जाफरजीन प्लॉटमधील मंगलम ट्रान्सपोर्ट एंजसीमध्ये घडला.
गंगाप्रसाद रामआधार निशाद यांच्या मालकीची जाफरजीन प्लॉटमध्ये मंगलम ट्रान्सपोर्ट एजंसी आहे. गुरुवारी रात्री ते कार्यालयात बसले असताना २८ ते ३० वर्षे या वयोगटातील एक इसम तेथे गेला. एमएच ३० एक्यू ७८८ या शाईन वाहनाने तो तेथे पोहोचला होता. निशाद यांच्याशी हस्तांदोलन करून त्याने आपण ‘लोकमत’चा पत्रकार असल्याची बतावणी करून १० हजार रुपये मागितले व धमकीसुध्दा दिली. त्यावर ‘लोकमत’च्या एका कर्मचाऱ्याला मी ओळखत असल्याचे सांगून निशाद यांनी फोन लावला असता त्या तोतयाने गुन्ह्यात अडकू नये, या भीतीपोटी शाईन दुचाकी तेथेच टाकून पळ काढला. याबाबत गंगाप्रसाद निशाद यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली.
या खंडणीखोर तोतयाविरोधात कायदेशीर तक्रार देण्याची सूचना ‘लोकमत’ कडून निशाद यांना करण्यात आली. दरम्यान शहर कोतवाली पोलिसांनी ती दुचाकी जप्त केली असून त्या तोतया पत्रकाराविरुध्द भादंविच्या कलम ३८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)