खंडणीबहाद्दर होता खांडेराव
By admin | Published: April 23, 2017 12:17 AM2017-04-23T00:17:26+5:302017-04-23T00:17:26+5:30
शहरातील कुख्यात अशोक गजभिये याचा खातमा झाल्यानंतर त्याच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत.
पोलिसात गुन्हे दाखल : सर्वच व्यावसायिक होते त्रस्त
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
शहरातील कुख्यात अशोक गजभिये याचा खातमा झाल्यानंतर त्याच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना कुख्यात गुंड अशोक गजभिये ऊर्फ खांडेराव राजरोसपणे खंडणी मागत होता. भरमसाठ पैसा गोळा करून तो मौज मजा करीत असल्याचे चौकाचौकांतील चर्चेदरम्यान उघडकीस येऊ लागले आहे. नागरिकांनी त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल होता.
अशोक गजभिये ऊर्फ खांडेराव याची बडनेरा शहरात प्रचंड दहशत होती. विविध गुन्हे करणाऱ्या खांडेरावची शहरात कुख्यात गुंड म्हणून दहशत तयार झाली होती. शस्त्र बाळगणे, गैरकायदेशीर मंडळी गोळा करणे, खंडणी मागणे व गुन्ह्यातून खांडेरावने शहरातील सर्वच प्रकारच्या व्यावसायिकांना धमकावित पैसे मागीत होता. अशाच एका खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याची एवढी दहशत होती की बरेच व्यावसायिक घाबरून त्याला महिन्याकाठी पैसे देत असल्याचे आता बोलल्या जात आहे. अधिकृत दारु विक्रेत्यांना त्याचा प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत होता. पैसे, दारू मागत होता, अन्यथा पोलिसांत तक्रार करण्याची धमकी तो देत होता. स्थानिक व्यावसायिकांनी तत्त्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे खांडेरावच्या विरोधात तक्रार केली होती. अनेक वर्षांपासून तो राजरोसपणे महिन्याकाठी व्यावसायिकांना पैशासाठी त्रस्त करीत होता. राशन दुकानदारांसह काही अधिकारी त्याच्या या वागणूकीमुळे त्रस्त झाले होते. यात त्रासातून लोकांनी त्याला ठेचूण मारले, असे सांगण्यात येत आहे. त्याच्या मृत्यूमुळे सर्वांचीच डोकेदुखी गेली असेही बोलले जात आहे. महिलांनी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याचा अक्कु यादव करण्याचा दोनदा प्रयत्न केला होता. खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी चांगलाच चोप दिला होता.