८० वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार, आरोपी निर्दोष
By admin | Published: March 25, 2015 12:15 AM2015-03-25T00:15:49+5:302015-03-25T00:17:18+5:30
८० वर्षांच्या म्हातारीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष सुटका करण्याचा निर्णय अचलपूरच्या जिल्हा सत्र न्यालयाने दिला.
नरेंद्र जावरे अचलपूर
८० वर्षांच्या म्हातारीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष सुटका करण्याचा निर्णय अचलपूरच्या जिल्हा सत्र न्यालयाने दिला. ३० वर्षांनंतर हा निकाल देण्यात आला.
घटनेची हकीकत अशी की, शेंडगाव (ता. अंजनगाव, जि. अमरावती) येथील आरोपी रमेश रामचंद्र सोळंके याचेवर शेंडगाव (मलकापूर खुर्द) येथील एका म्हातारीवर दिनांक ७ जानेवारी १९८७ रोजी खल्लार पो. स्टे. ला बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तत्कालीन पोलीस अधिकारी रऊफ खान यांनी आरोपीला अटक केली. अमरावती येथील तत्कालीन सत्र न्यायाधीश किनगावकर यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने पीडिताच्या वयाची नोंद घेऊन तिची साक्ष न्यायालयात नोंदवून घेतली. प्रकरणातील पीडितेची साक्ष झाल्यानंतर ती मृत पावली.
दरम्यान आरोपी फरार झाला. त्यामुळे सदरचे प्रकरण अमरावती येथील सत्र न्यायालयात पडून होते. १९९२ साली अचलपूर येथे सत्र न्यायालयाची स्थापना झाली. सदरचे प्रकरण हे अचलपूर येथील सत्र न्यायालयात निवाड्याकरिता पाठविण्यात आले. मात्र आरोपीचा पत्ता लागत नसल्याने आरोपीविरूद्धचे प्रकरण हे डॉर्मन्ट फाईल म्हणून पडून होते. आरोपीचा पत्ता लागत नसल्याने न्यायनिवाडा होईल की नाही हा प्रश्न उभा ठाकला होता.
अचलपूर येथील सत्र न्यायाधीश पाटकर यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेवून खल्लार पोलीस स्टेशनला आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेश दिले. पी. एस. ओ. शेळके यांनी आरोपीचा तपास घेतला. तपासादरम्यान आरोपी आकोट तालुक्यातील चित्तरवाडी ह्या गावी नातेवाईकाकडे वास्तव्यास असल्याचा सुगावा लागला.
सत्र न्यायाधीश पाटकर यांच्या न्यायालयाने पुन्हा आरोपी विरुद्ध साक्षदारांना समन्स काढले. काही साक्षदार मृत झाल्याचे आढळून आले. ह्यात मधुकर गावनेर व सहदेव तेलमोरे यांना वार्धक्यामुळे अक्षरश: आधार देवून न्यायालयात साक्षीकरीता हजर करण्यात आले. तपास अधिकारी यांचे सहाय्यक जमादार मधुकर व पिडीतेची तपासणी करणाऱ्या डॉ. आशा ठाकरे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्यात. २८ वर्षानंतरही साक्षीदार घटना विसरले नव्हते.
न्यायालयाने आरोपीच्या बचावाकरीता वकील रवींद्र गोरले यांची नियुक्ती केली होती. शासनामार्फत ज्येष्ठ सरकारी वकील संतोष बोरेकर यांनी कामकाज पाहिले. उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर तब्बल ३० वर्षांनी आरोपीला संशयाचा फायदा देवून निर्दोष मुक्त करण्यात आले.
अशी झाली अटक
२८ वर्षानंतर फरार आरोपीला नेमके कसे ओळखावे व पुन्हा आरोपी कसा जेरबंद करावा याकरिता पोलिसांनी सापळा रचला. पी. एस. ओ. शेळके व त्यांचे सहकारी चित्तरवाडी या गावी महसूल अधिकाऱ्यांचा बनाव करून घरकूल यादीसह गावात पोहोचले. गावकऱ्यांना तसे सांगण्यात आले. गावातील यादीप्रमाणे ग्रामस्थांना घरकुल वाटप करावयाचे आहे. सदर यादीत आरोपी रमेश सोळंके याचेसुद्धा नाव समाविष्ट होते. यादीप्रमाणे गावकऱ्यांना पुकारण्यात आले. आरोपी रमेश रामचंद्र सोळंके यालासुद्धा पुकारण्यात आले. आपल्यालासद्धा घरकुल मिळणार या भावनेने आरोपी हरकून गेला. तो पुढे आला. पी. एस. ओ. शेळके व प्रकाश काळे व सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आरोपीला जेरबंद केले.