बलात्काराच्या आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:17 AM2021-08-20T04:17:18+5:302021-08-20T04:17:18+5:30
फोटो १९ एएमपीएच ०२ अमरावती : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीत ...
फोटो १९ एएमपीएच ०२
अमरावती : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केली. या घटनेने अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक राजापेठ पोलीस ठाण्यातील कोठडीमध्ये गुरुवारी सकाळी ६.३० ते ७ च्या सुमारास ही घटना घडली. ही घटना ‘डेथ इन कस्टडी’मध्ये मोडत असल्याने प्रकरणाची सारी सूत्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने हाती घेतली आहेत. सागर श्रीपत ठाकरे (२४,,रा. खंबीत, ता. आष्टी, जि. वर्धा) असे पोलीस कोठडीत आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात ४ ऑगस्ट रोजी सागर श्रीपत ठाकरे याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून मुलीला परत आणले. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून सागरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सागरला अमरावतीला बोलवले व त्याला अटक केली. १७ ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली. न्यायालयात उपस्थित केल्यानंतर त्याला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात लॉकअपची व्यवस्था नसल्याने सागरला बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. रात्रपाळीमध्ये कोठडीसमोर चार गार्डदेखील होते.
कोठडीच्या दाराला घेतला गळफास
पोलीस सूत्रांनुसार, गुरुवारी सकाळी ६.४५ च्या पुढे सागरने आपल्या शर्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. शहर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर, महसूलचे अधिकारी तसेच सीआयडीचे अधीक्षक अमोघ गावकर, सीआयडीच्या उपअधीक्षक दीप्ती ब्राम्हणे यांनी घटनास्थळी भेट दिली. शहर पोलीस उपायुक्त विक्रम साळी व शशिकांत सातव, एसीपी भारत गायकवाड हे सायंकाळपर्यंत राजापेठ पोलिसांत तळ ठोकून होते.
न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा
प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी पुरोहित, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, अमरावतीचे उपविभागीय दंडाधिकारी व राज्य गुन्हे अन्वेशन विभागाचे अधीक्षक अमोघ गावकर, पोलीस उपायुक्तद्वयांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. दुपारी मृताची बहीण, जावई राजापेठ ठाण्यात पोहोचले. राजापेठ पोलिसांनी हे कांड घडवून आणले, असे नातेवाइकांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.