अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला सहा वर्षे सक्तमजुरी
By प्रदीप भाकरे | Published: May 31, 2023 05:46 PM2023-05-31T17:46:12+5:302023-05-31T17:46:31+5:30
पोस्कोअन्वये सर्वाधिक शिक्षा : विशेष अतिरिक्त न्यायाधिशांचा निर्णय
अमरावती : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवून सहा वर्ष सक्तमजुरी व एकुण १२ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष अतिरिक्त न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी बुधवारी हा निर्णय दिला. निलेश दामोधर खोंडे (४२, नंदनवन कॉलनी, रूख्मिनीनगर) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दवाखान्याजवळ २६ जून २०१९ रोजी रात्री ९ च्या सुमारास ती घटना घडली होती. आपल्या अल्पवयीन मुलीला घेऊन तिची आई दवाखान्यात गेली होती. तपासणीनंतर ती मेडिकलमध्ये गेली असता, आरोपीने त्या अल्पवयीन मुलीची छेड काढली. तिचा विनयभंग केला. हा प्रकार पिडिताच्या आईने डोळ्याने पाहिला. त्यावेळी काही प्रत्यक्षदर्शीनी आरोपीला पकडले होते. याप्रकरणी पिडिताच्या आईने राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले.
साक्ष, युक्तीवाद ग्राह्य
याप्रकरणी विशेष सरकारी वकील प्रफुल्ल तापडिया यांनी पिडिता, तिची आई तथा दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासले. यात साक्ष व युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायाधिशांनी आरोपी निलेशला विनयभंग व पोस्कोच्या विविध कलमांन्वये दोषी ठरविले. एकुण १२ हजारांच्या दंडाच्या रकमेपैकी ५ हजार रुपये हे पिडितास नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने दिला. याप्रकरणाचा तपास पीएसआय शीतल निमजे यांनी केला होता. तर पैरवी पोलीस अंमलदार अरूण हटवार यांनी काम पाहिले