मोर्शी येथे जलद ताप सर्वेक्षण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:49+5:302021-07-18T04:09:49+5:30
मोर्शी : उपजिल्हा रुग्णालयातर्फे रामजी बाबानगर येथे १६ जुलै रोजी जलद ताप सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. डेंग्यूसदृश स्थिती असल्यामुळे ...
मोर्शी : उपजिल्हा रुग्णालयातर्फे रामजी बाबानगर येथे १६ जुलै रोजी जलद ताप सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. डेंग्यूसदृश स्थिती असल्यामुळे ही मोहीम राबविण्यात असल्याचे वैद्यकीय अधिकारी ............................ यांनी सांगितले.
प्रत्येक चमूने वॉर्डनिहाय गृहभेटी देऊन कंटेनर सर्वेक्षण केले व लोकांना कीटकजन्य आजाराविषयी माहिती देऊन करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले. साचलेले पाणी वाहते करणे, कूलरमधील पाण्यात डास अळी झाल्यास पाणी फेकून देणे, कुंडी, टायर, नारळाच्या करवंटी, भंगार साहित्यात पावसाचे पाणी साचल्यास पाणी खाली करणे, व्हेंट पाईपला कापड जाळी लावणे, झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करणे, घरातील खिडक्यांना जाळी लावणे, घरासमोरील नाल्या वाहत्या करणे, त्यात वापरलेले ऑईल टाकणे तसेच गप्पी मासे पाळण्याचे महत्त्व सांगण्यात आले. दूषित घरातील कंटेनरमध्ये टॅमिफॉस ॲक्टिव्हिटी राबविण्यात आली व काही दूषित घरातील कंटेनर रिकामे करण्यात आले. याप्रसंगी हत्तीरोग उपपथक मोर्शी येथील आरोग्य सहायक अनिल जाधव, प्रकाश मंगळे, सुधाकर कडू व उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील विनय शेलूरे, आरोग्य कर्मचारी प्रशांत बेहरे, हत्तीरोग उपपथक, नेरपिंगळाई येथील आरोग्य सहायक बाबाराव गवई, प्रफुल दिवे, गोकुल वाकोडे आदी आरोग्य कर्मचारी तसेच मोर्शी येथील नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.