पॅथॉलॉजिकल इन्फेक्शनमधून पू निर्माण करणाऱ्या जिवाणूच्या निदानासाठी रॅपिड टेस्ट किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:15+5:302021-05-14T04:13:15+5:30
१३एएमपीएच १० (डॉ. प्रशांत ठाकरे), १३एएमपीएच११ (डॉ. नीरज घनवटे), १३एएमपीएच१२ (पेटंट प्रमाणपत्र) अमरावती विद्यापीठाचे डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. ...
१३एएमपीएच १० (डॉ. प्रशांत ठाकरे), १३एएमपीएच११ (डॉ. नीरज घनवटे), १३एएमपीएच१२ (पेटंट प्रमाणपत्र)
अमरावती विद्यापीठाचे डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. नीरज घनवटे यांची फलश्रुती, पेंटट मंजूर, २५० रुपयांत चार वेळा करता येणार चाचणी
अमरावती : रुग्णालयातील पॅथॉलाॅजिकल इन्फेक्शनमधून मानवासाठी घातक ठरणारा व जखमेत पू निर्माण करणाऱ्या ‘स्टेफिलोकोकस ऑरियस‘ या जिवाणूचे निदान सात ते आठ तासांत करणारी टेस्ट किट संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे बायोटेक्नॉलॉजी विभागातील सहयाेगी प्राध्यापक प्रशांत ठाकरे व मायक्रोबायोलॉजी विभागातील सहयाेगी प्राध्यापक नीरज धनवटे यांनी शोधून काढले. त्याचे पेटंट या जोडगोळीला मिळाले आहे. अवघे २५० रुपये खर्चून चार वेळा चाचणी या किटद्वारे होऊ शकते. यापूर्वी २४ ते ४८ तासांत होणाऱ्या निदानाचा कालावधी या किटने चार ते आठ पटींनी कमी केला आहे.
दुसऱ्या महायुद्धात जखमा होऊन मोठ्या प्रमाणात सैनिक दगावत होते. त्यावेळी ॲलेक्झॅंडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलीन या प्रतिजैविकाचा शोध लावला. यात जिवाणूवर मात केली. परंतु, यातून वेगवेगळे जिवाणू (बॅक्टेरिया) उदयास आले. मेथिसिलिन-प्रतिरोधक स्टेफिलोकोकस ऑरियस (एमआरएसए) हा स्टेफिलोकोकस ऑरियसचे घातक स्वरूप असलेल्या जिवाणू यापैकीच एक. या जिवाणपासून जखमा मोठ्या होतात. उपचारासाठी ॲन्टीबायोटिकचा डोस दिला जातो आणि किती वेळात तो नष्ट होईल, हे ठरविले जाते. आजपर्यंतच्या वैद्यकीय निदान पद्धतीत या जिवाणूचे निदान व उपचार सुरू करण्यासाठी २४ ते ४८ तासांचा कालावधी आणि महागडी उपकरणे लागतात. अशावेळी रुग्णांची परिस्थिती नाजूक होते. मात्र, आता किट फॉर रॅपिड डिटेक्शन ऑफ मेथिसिलिन-प्रतिरोधक स्टेफिलोकोकस ऑरियस (एमआरएसए) हे केवळ सात तासांतच निदान करणार आहे. ज्या ठिकाणी महागडी उपकरणे नाहीत, अशा आरोग्य केंद्रात ही किट वापरता येणार आहे. २५० रुपयांत चार वेळा चाचण्या करता येणार आहे. या किटसाठी डॉ. निरज घनवटे आणि डॉ. प्रशांत ठाकरे यांना पेटंट देण्यात आले आहे. अजून एक पेटंट प्रक्रियेत आहे आणि लवकरच मंजूर होईल. हे दोन शास्त्रज्ञ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डायग्नोस्टिक लॅबमध्ये नोडल अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाशी संबंधित सुमारे अडीच लाख थ्रोट स्वॅबची चाचणी येथे करण्यात आली. ते राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग (मुंबई) द्वारे एक कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्यीत दोन प्रकल्पांचीदेखील अंमलबजावणी करीत आहेत. नेचर या जागतिक पातळीवरील नामांकित जर्नलमध्ये त्यांचे लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.
००००००००००००००००००००००००००००००
२०१७ मध्ये नोंदणी आणि २०२१ मध्ये पेंटट मंजूर
किट फॉर रॅपिड डिटेक्शन ऑफ मेथिसिलिन-प्रतिरोधक स्टेफिलोकोकस ऑरियस (एमआरएसए) ची डिझाईन पेंटट नोंदणीसाठी २०१७ मध्ये फाईल करण्यात आली होती. प्रारंभी काही त्रुटी दूर करण्यात आल्या. सन २०२० मध्ये ऑनलाईन परीक्षा दिली. पुन्हा यातील काही त्रुटी दूर करण्यात आल्या. १२ मे २०२१ रोजी पेटंटला मान्यता मिळाली. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनात हे पेटंट पूर्णत्वास आले.
०००००००००००००