मेळघाटात दुर्मीळ रानपिंगळा मृतावस्थेत आढळला, कारण गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 10:26 AM2022-01-06T10:26:36+5:302022-01-06T10:29:05+5:30
चौराकुंड वनपरिक्षेत्रातील बफर क्षेत्रात या रानपिंगळ्यावर १७ डिसेंबर रोजी रेडिओ टेलिमेंटरी टॅग केले होता. यात त्याच्या हालचाली सुरळीत चालू असल्याचे दिसून आले होते. मात्र, ३ जानेवारी रोजी तो अचानक मृतावस्थेत आढळून आला.
परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागातील चौराकुंड वनपरिक्षेत्रात एक रानपिंगळा(Forest Owlet) सोमवारी मृतावस्थेत आढळून आला.
शेड्यूल-१ मधील हा दुर्मीळ रानपिंगळा अभ्यासादरम्यान मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. चौराकुंड वनपरिक्षेत्रातील बफर क्षेत्रात या रानपिंगळ्यावर १७ डिसेंबर रोजी रेडिओ टेलिमेंटरी टॅग केले होता. रेडिओ टॅग केल्यापासून मयंक शुक्ला यांनी संकलित केलेल्या माहितीनुसार, या रानपिंगळाच्या रेडिओ टॅग केल्यानंतर हालचाली सुरळीत चालू होत्या. ३ जानेवारी रोजी तो अचानक मृतावस्थेत आढळून आला.
सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्यभारती एम., प्रशिक्षणार्थी आयएफएस मधुमिथा एस. आणि सहायक वनसंरक्षक के.एस. पाटील यांच्या उपस्थितीत मल्हारा येथील पशुधन विकास अधिकारी धीरज दातीर यांनी त्याचे शवविच्छेदन ४ जानेवारीला परतवाडा येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला केले. यामध्ये जखम वा अनैसर्गिक बाब आढळली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मानद वन्यजीव रक्षकांना डावलले
शेड्यूल-१ मधील पक्षी किंवा वन्यजीव मृतावस्थेत आढळून आल्यास त्याचे शवविच्छेदन मानद वन्यजीव रक्षकांच्या उपस्थित करणे गरजेचे ठरते. असे असतानाही चौराकुंड वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळून आलेल्या या शेड्यूल-१ मधील रानपिंगळ्याच्या शवविच्छेदनादरम्यान मानद वन्यजीव रक्षक उपस्थित नव्हते, असे सिपना वन्यजीव विभागाच्या प्रेस नोट वरून स्पष्ट होते.
शेड्यूल-१ मधील वन्यप्राणी किंवा पक्षी यांचे शवविच्छेदन मानद वन्यजीव रक्षकांच्या उपस्थितीतच व्हायला हवे. मृतावस्थेत आढळून आलेल्या या रानपिंगळाच्या अनुषंगाने मला कुठलीही माहिती वन्यजीव विभागाकडून दिली गेली नाही. शवविच्छेदनादरम्यान बोलाविले गेले नाही.
- डॉ. जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक अमरावती.