मेळघाटात फुलला दुर्मीळ पिवळा पळस; केशरी, लाल फुलांनी बहरले माळरान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 10:20 AM2022-03-15T10:20:14+5:302022-03-15T10:51:07+5:30

दुर्मीळ असणारा पिवळा पळस मेळघाटातील मोरगड परिसरात फुलला असून तो दुरून लक्षवेधक ठरला आहे.

rare yellow palash flowers bloom in melghat amravati | मेळघाटात फुलला दुर्मीळ पिवळा पळस; केशरी, लाल फुलांनी बहरले माळरान

मेळघाटात फुलला दुर्मीळ पिवळा पळस; केशरी, लाल फुलांनी बहरले माळरान

googlenewsNext
ठळक मुद्देबहुगुणी पिवळा पळस

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : वसंताचे आगमन होताच रानावनात चाहूल लागते ती पानगळीसह विविध उमलणाऱ्या फुलांची. त्यात लाल, केशरी रंगांची मनसोक्त उधळण करणारा पळस सर्वांच्या नजरेला खेचणारा ठरतो. मात्र, दुर्मीळ असणारा पिवळा पळस मेळघाटातील मोरगड परिसरात फुलला असून तो दुरून लक्षवेधक ठरला आहे.

नानाविध प्रकारच्या वनस्पती, झाडांच्या शेकडो प्रजातींचा दुर्मीळ खजाना आजही मेळघाटच्या रानावनात आहे. त्यातच दुर्मीळ असणारा पिवळा पळस सोनापूर-मोरगड रस्त्यावर शहानूर प्रकल्प परिसरातील मागच्या भागात आढळून आला आहे. निसर्ग अभ्यासक व शिक्षक सुमीत गावंडे हेसुद्धा या पिवळ्या पळस बघून आश्चर्यचकित झाले. त्यांनी जवळून त्याचे निरीक्षण केले आणि पळस असल्याचा शिक्कामोर्तब केले.

आयुर्वेद शास्त्रात महत्त्व

दुर्मीळ पिवळ्या पळस फुलांचे आयुर्वेद शास्त्रात औषधीय महत्त्व आहे. सर्वसाधारणपणे पळस हा लाल, केशरी रंगाचा असतो. मात्र, पिवळा पळस हा दुर्मीळ मानला जातो. मेळघाटच्या घाट वळणातून असा दुर्मीळ खजिना आजही जैवविविधतेचे जतन करणारा ठरला आहे. विविध रंगात फुललेला पिवळा पळस मनोवेधक ठरत आहे.

पळसाच्या बिया देखील बहुगुणी पूर्वी धूलिवंदनाला एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग पळसाच्या फुलांपासून तयार केला जात असे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले, तर त्वचारोग नाहीसा होतो, हे त्यामागे आयुर्वेदात सांगितलेले महत्त्व. पळसाच्या बियांचा ही औषधींसाठी वापर केला जातो. असा बहुगुणा पळस सध्या फुलला आहे.

शहानूर प्रकल्पाच्या मागच्या बाजूला पिवळा पळस दिसताच थोडा वेळ थबकलो. जवळ जाऊन बघितले. पळस असल्याची खात्री झाली आणि दुर्मीळ प्रजाती बघितल्याचा आनंद झाला.

- सुमीत गावडे, निसर्ग अभ्यासक

अमरावती शहरालगतही पिवळा पळस

अमरावती शहरालगत बडनेरा ते कोंडेश्वर मार्गावर पिवळा पळस आपली गर्द पिवळ्या फुलांमुळे ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. वडाळी वनक्षेत्राचे सान्निध्य लाभलेला हा परिसर आहे. पळसाची झाडे दाटी करीत नाहीत. त्यामुळे ती झाडे लाकूडतोड्यांकडून सहज लक्ष्य होतात. त्यामुळे या वृक्षांच्या संवर्धनासाठी जनजागरण व्हावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी अमोल चवणे यांनी केली आहे.

Web Title: rare yellow palash flowers bloom in melghat amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.