इकडे रसगुल्ला तोंडात अन् तिकडे लस टोचली दंडात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:23+5:302021-09-11T07:19:36+5:30
शंकरबाबांच्या दिव्यांग मुलांना दुसरा डोस : असाही प्रयोग
नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : इंजेक्शन..... नाव घेताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. परंतु कोरोनामुळे सर्वांनाच लसीकरणासाठी मनाची तयारी नसतानाही महामारीच्या सुरक्षिततेपासून बचावासाठी तयार व्हावेच लागेल. लसीकरण घेताना अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या दिव्यांग गतिमंद अंध मुलांना मात्र ...रसगुल्ला तोंडात आणि पटकन् व्हाॅक्सिन हातात असा यशस्वी प्रयोग दुसऱ्यांदाही गुरुवारी करण्यात आला
वझ्झर येथे स्वर्गीय अंबादास पंतवैद्य मूक-बधिर मतिमंद बालगृह आहे. ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या ६४ दिव्यांग मुला-मुलींना कोविशिल्डचे कोरोना लसीकरण गुरुवारी करण्यात आले. धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी येथे कॅम्प लावला होता.
वैद्यकीय अधिकारी पूनम मोहोकार, आरोग्य सेविका लसटोचक मुक्ता केंद्रे, आरोग्य सेवक देवेंद्र संभे, समुदाय आरोग्य अधिकारी मोनिका आठोले आदींनी सहभाग घेतला होता.
बॉक्स
तोंडात रसगुल्ला....
दिव्यांग मुलं आणि त्यांचे लसीकरण कसे करायचे, मुलाने हात जरी हलवले किंवा इंजेक्शन देताना काही हालचाल केली तर मोठी दुखापत होण्याची भीती आरोग्य यंत्रणेवर होती. तर या अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांनासुद्धा काळजी वाटली होती. त्यावरच शंकरबाबांनी स्वतः उपाय काढला. लसीकरण दरम्यान रसगुल्ला, मिठाई बोलावली आणि तोंडात रसगुल्ला टाकताच दुसरीकडून लसीकरणचे इंजेक्शन टोचल्या जायचे. त्यामुळे अगदी शांततेत हे लसीकरण गुरुवारी दुसऱ्यांदा पार पडले.
बॉक्स
ना ताप ना कोरोना ....
कोरोना काळात वझ्झर येथील बालसुधारगृह आरोग्य कर्मचारी वगळता सर्वांसाठी प्रवेश निषेध करण्यात आले होते. त्यामुळे या परिसरात शंकरबाबांच्या या दिव्यांग मुलांना कोरोना अजून शिवला नाही. तर इंजेक्शन दिल्यानंतर एकाही मुलाला ताप आला नसल्याचे आरोग्य कर्मचारी सांगतात. दुसरीकडे बालगृहाच्या भिंतीला लागून अगदी हाकेच्या अंतरावर समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळेत कोरोना विलगीकरण केंद्र होते; परंतु या परिसरात शंकरबाबांनी येण्यास सर्वांना सक्त मनाई केली होती, हे विशेष.
बॉक्स
पंचवीस एकरांत हजारो वृक्ष
स्वर्गीय अंबादास पंथ मतिमंद बाल सुधारगृहात या परिसरातील २५ एकर जागेवर हजारो विविध प्रजातींचे वृक्ष लावण्यात आली आहेत. शंकरबाबांची गतिमंद मुलं ऑक्सिजन देणाऱ्या अनेक वृक्षांची लागवड, त्याची देखभाल, पाणी टाकण्याचे कार्य करीत असल्याचे शंकरबाबा अभिमानाने सांगतात. संपूर्ण परिसरच ऑक्सिजन युक्त आहे
कोट
दिव्यांग मुलांना जगविण्याची धडपड सुरू आहे. कोरोनाचा शिरकाव माझ्या मुलापर्यंत पोहोचू दिला नाही. त्यासाठी आजही कटाक्षाने काळजी घेतल्या जात आहे. कोरोना लसीकरणासाठी तोंडात रसगुल्ला किंवा मिठाई देऊन यशस्वी अशी ही मोहीम आम्ही आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांच्या सहकार्याने पूर्ण केली.
शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ समाजसेवक, वझ्झर अचलपूर
कोट
दिव्यांग मुलांना लसीकरण करण्यासाठी खूप त्रास होईल ही मनात भीती होती; परंतु बाबा व आम्ही रसगुल्ला आणि मिठाईचा प्रयोग करीत लसीकरण दुसऱ्या टप्प्यात यशस्वी केले.
-मुक्ता केंद्रे, आरोग्य सेविका, लसटोचक, आरोग्य केंद्र धामणगाव गढी, अचलपूर