राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन १ डिसेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 07:21 PM2019-11-20T19:21:36+5:302019-11-20T19:21:51+5:30
ईश्वराने निर्माण केलेल्या या विश्वात संत परंपरेने साहित्य निर्मिती करून सामान्य जणांना प्रबुद्ध केले.
- अमित कांडलकर
गुरुकुंज-मोझरी (अमरावती) : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ व भारतीय विचारमंच, विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन १ डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहे.
ईश्वराने निर्माण केलेल्या या विश्वात संत परंपरेने साहित्य निर्मिती करून सामान्य जणांना प्रबुद्ध केले. त्याच संत परंपरेतील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अतुल्य साहित्य निर्मितीतून प्रगटलेल्या विचारांना उजाळा देण्यासाठी व त्यांच्या समग्र साहित्यावर विचारमंथन करण्यासाठी सातवे विदर्भस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ८ वाजता गुरुकुंज आश्रमातून ग्रंथदिंडी काढण्यात येईल. सकाळी १०.३० वाजता उद्घाटन समारोह होईल. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजाचे प्राचार्य गजानन जाधव, उद्घाटक म्हणून राजेश जयपूरकर, प्रमुख अतिथी म्हणून सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे हे उपस्थित राहतील. सूत्रसंचालन दिलीप कोहळे करतील.
दुपारच्या सत्रात परिसंवाद कार्यक्रमात राष्ट्रसंतांच्या साहित्यातील सांस्कृतिक राष्ट्रदर्शन या विषयावर सूर्यप्रकाश जयस्वाल हे मत व्यक्त करतील. यावेळी अध्यक्षस्थानी अरविंदराव देशमुख हे राहतील. सबका हो विश्वास प्रभू पर, अपनी शक्ती बढाने या विषयावर नागपूरच्या शलाका जोशी या विचार व्यक्त करतील. ग्रामगीतेतील मातृशक्ती आणि राष्ट्रनिर्माण या विषयावर कोमल ठाकरे या मत व्यक्त करतील. दरम्यान राष्ट्रसंतांच्या काव्यातील देशभक्ती या विषयावर सुधीर रायपूरकर हे आपले विचार व्यक्त करतील.
दुपारी ३ ते ४ वाजता अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांच्यासोबत 'एक संवाद आधारवडाशी' या विषयावर संवादक राजेंद्र नाईकवाडे व ज्ञानेश्वर गहूकर हे असतील. दुपारी ४ ते ५ वाजता या कार्यक्रमाचा समारोप होईल. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्ञानेश्वर महाराज वाघ राहतील. सूत्रसंचालन अरुण मेश्राम करतील. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती सुभाष लोहे, विदर्भ प्रांत संयोजक भारतीय विचारमंच यांनी पत्रपरिषदेतून दिली. यावेळी संयोजक राजाराम बोथे, अरुण मेश्राम, अरविंद राठोड, अमोल बांबल उपस्थित होते.