राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भाषणे इंग्रजीत येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 08:12 PM2019-08-05T20:12:00+5:302019-08-05T20:12:15+5:30
आपल्या ओजस्वी व अत्यंत प्रभावी वाणीने आणि खंजिरीच्या निनादात सर्वसामान्यांचे प्रबोधन व त्यांना मंत्रमुग्ध करणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर दिलेल्या सर्व भाषणांच्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्यात येणार आहे.
- सचिन मानकर
दर्यापूर - आपल्या ओजस्वी व अत्यंत प्रभावी वाणीने आणि खंजिरीच्या निनादात सर्वसामान्यांचे प्रबोधन व त्यांना मंत्रमुग्ध करणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर दिलेल्या सर्व भाषणांच्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्यात येणार आहे. या पुस्तकाचे संपादन विख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण विजय भटकर करतील.
राष्ट्रसंतांच्या भाषणांचा संग्रह करून ते ‘राष्ट्रसंतांची भाषणे’ या पुस्तकस्वरूपात लेखक बाबा मोहोड यांनी संपादन करून प्रकाशित केला आहे. याच पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्याची संकल्पना दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष गजानन भारसाकळे यांनी मांडली. ते अकोला येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. श्रीगुरुदेव प्रकाशन (गुरुकुंज मोझरी) यांच्याकडून या भाषांतराबाबत गाडगेबाबा मंडळाने परवानगी मिळवली आहे. राष्ट्रसंतांच्या भाषणांच्या इंग्रजी पुस्तकाचे संपादन विख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण विजय भटकर करतील.
भाषांतराची जबाबदारी कलावंत यशश्री अशोक काशीकर (रा. वरूड) यांनी गाडगेबाबा मंडळाच्यावतीने स्वीकारली आहे . काही दिवसांपूर्वी गुरुकुंज आश्रम येथील भेटीदरम्यान विजय भटकर, डॉ. राजाराम बोथे, प्रकाश महाराज वाघ, गजानन भरसकळे, डॉ. अनिल वाघ, अमोल बांबल व निखिल पडघान यांच्यात या विषयावर सविस्तर चर्चा झाली.
‘राष्ट्रसंताची पत्रे’ या बाबा मोहोड लिखित मराठी पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर तयार झाले असून, ते अंतिम तपासणीसाठी श्रीगुरुदेव प्रकाशनकडे सादर करण्यात आले आहे. दर्यापूर येथील प्रा. जी.के. पाटील यांनी भाषांतरित केलेल्या या इंग्रजी पुस्तकाचे संपादन डॉ. भटकर यांनीच केले आहे. यानंतर ‘राष्ट्रसंतांची प्रवचने’ हे मराठी पुस्तकसुद्धा इंग्रजीत भाषांतर करण्याची योजना आहे. तिन्ही पुस्तके इंग्रजीत आणून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार जगभरात करण्याचा मनोदय भारसकळे यांनी व्यक्त केला.