राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव यंदा लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 02:46 PM2020-10-07T14:46:38+5:302020-10-07T14:47:03+5:30
Tukdoji Maharaj, Amravati News राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरीत्या साजरा न करण्याचा निर्णय अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरीत्या साजरा न करण्याचा निर्णय अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने घेण्यात आला आहे. हा निर्णय पत्रकार परिषदेत सोमवारी जाहीर करण्यात आला. तब्बल ५१ वर्षांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सार्वजनिक पुण्यतिथी महोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. लाखोंच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव अर्थात सर्वसंत स्मृति मानवता दिन ३० आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे प्रस्तावित होता. परंतु, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व धार्मिक महोत्सव व धार्मिक स्थळांवरील बंदी लक्षात घेऊन गुरुदेवभक्तांनी त्यांच्या गावातच कोविड नियमाचे पालन करून ५ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी गुरुमाउलींना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाने गुरुदेवभक्तांना केले आहे.
गुरुकुंजात ५० जणांची उपस्थिती
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी स्थळावर प्रशासनाने आखून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून ५० लोकांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्साचा विधिवत प्रारंभ ३० आॅक्टोबर रोजी ब्रम्हमुहूर्तावर करण्यात येईल. याच ठिकाणी ५ नोव्हेंबरला दुपारी ४.५८ मिनिटांनी ५० लोकांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल व त्याचे आॅनलाईन प्रसारण करण्यात येईल, असे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे गुरुकुंज आश्रम येथील केंद्रीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी सांगितले. ३० तारखेला तीर्थस्थापनेच्या कार्यक्रमानंतर सात दिवस समाजप्रबोधनाचे कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम यंदा राहणार नाही.
पत्रकार परिषदेला उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, दामोदर पाटील प्रचारप्रमुख, अध्यात्म विभागाचे प्रमुख राजाराम बोधे, चंद्रपूर जिल्हा सेवाधिकारी रुपलाल कावळे, चंद्रलाल शर्मा, शरद कांडलकर आदि उपस्थित होते.