यंदाच्या हंगामासाठी पीककर्जाचे दर निश्चित
By admin | Published: April 12, 2017 12:40 AM2017-04-12T00:40:26+5:302017-04-12T00:40:26+5:30
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यास १५९१.६२ कोटींच्या पीककर्जाचा लक्षांक देण्यात आला आहे.
तांत्रिक गटसमितीची शिफारस : गतवर्षीच्या तुलनेत अंशत: वाढ
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यास १५९१.६२ कोटींच्या पीककर्जाचा लक्षांक देण्यात आला आहे. यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीने पीकनिहाय कर्जाच्या दराची शिफारस केली होती. त्यामध्ये जिल्हा तांत्रिक गट समितीने ५०० ते १ हजार रूपयांची वाढ करून दर निश्चित केले आहे.
यंदाच्या खरीप व रबी हंगामासाठी १५९१.६२ कोटी रूपयांचा पीककर्ज लक्ष्यांक आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेला ६३० कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना ११५१.७० कोटी व ग्रामीण बँकांना १५९.३० कोटी रूपयांच्या कर्जाचा लक्ष्यांक दिला आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपास सुरूवात होणार आहे. शासनाने यासाठी सर्व बँकांना ३० जून ही ‘डेडलाईन’ दिली आहे.
यामध्ये धानाला हेक्टरी किमान ४० हजार, कांदा व इतर भाजीपाला पिकांना ५० हजार रूपये, खरीप भुईमूग २८ हजार, उन्हाळी भुईमूग ३६ हजार, एरंडी ११ हजार, बागायती मिरची ६५ हजार, पपई ४२ हजार, बटाटे, रताळे ६० हजार, ऊस ८० हजार, हळद ८५ हजार, अद्रक ८५ हजार, आंबा ५५ हजार, चिकू व पेरू ५० हजार, सिताफळ ४५ हजार, आवळा व बोर ३५ हजार, पानपिंपळी ७० हजार व फुलशेतीला ६० हजार रूपये हेक्टर किमान पीककर्जाचे दर राहणार आहेत.
शासनाने पीककर्जाचा लक्ष्यांक व पिकनिहाय कर्जाचे दर निश्चित केले असले तरी बँकांद्वारा अद्याप खरिपासाठी पीककर्ज वाटपास सुरूवात झालेली नाही. मोठ्या प्रमाणात शेतकरी थकीत कर्जदार असल्याने बँकांनी देखील कर्जवाटपासाठी आखडता हात घेतला आहे. (प्रतिनिधी)
संत्र्याला प्रतिझाड
३२० रूपये कर्जदर
जिल्हास्तरीय तांत्रिक गट समितीने निश्चित केलेल्या कर्जदारानुसार संत्रा व मोसंबीस यंदा प्रतिझाड किमान ३२० रूपये असे कर्जाचे दर आहेत. डाळींब ९० हजार, लिंबू ६० हजार, केळी साधारण ८५ हजार, केळी टिश्यूकल्चर एक लाख रूपये असे कर्जाचे दर आहेत.