जिल्हानिहाय पीक कर्जाचे दर ठरणार जानेवारीत
By Admin | Published: December 30, 2015 01:23 AM2015-12-30T01:23:31+5:302015-12-30T01:23:31+5:30
सन २०१६-१७ मधील पिकांच्या उत्पादनासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना द्यावयाच्या प्रतिहेक्टरी पीकनिहाय कर्जाचे दर
राज्यस्तर समितीचे ठरले दर : जिल्हा बँक बोलाविणार बैठक
अमरावती : सन २०१६-१७ मधील पिकांच्या उत्पादनासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना द्यावयाच्या प्रतिहेक्टरी पीकनिहाय कर्जाचे दर शासनाच्या राज्यस्तरीय समितीमार्फत निश्चित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय तांत्रिक समित्याद्वारा जानेवारी २०१६ मध्ये पीककर्ज दराची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बैठक बोलाविण्यात येणार आहे.
शासनाचे ८ जून २०११ आणि ५ मे २०१४ रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील बँकांकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीककर्जामध्ये दरवर्षी आवश्यकतेनुसार वाढ सुचविण्यासाठी व कर्जवाटप प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार १ आॅक्टोबर २०१५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या सभेत २०१६-१७ या वर्षात विविध पिकांच्या उत्पादनासाठी बँकांकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिहेक्टरी पीकनिहाय कर्जाचे दर निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील खरीप-रबी पिकासह भाजीपाला, फुल पिके, फळपिके, फळझाडे अशा एकूण ७० पिकासाठी पिकनिहाय कर्जाचे दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर येत्या एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे.
यासंदर्भात जिल्हानिहाय अंमलबजावणीचे नियोजन जिल्हा तांत्रिक समित्याद्वारा येत्या जानेवारी महिन्यात करण्यात येणार आहे. यात राज्यस्तर समितीने निश्चित केलेल्या पीक कर्जाच्या दराव्यतिरिक्त १० ते १५ टक्क्यापर्यंत वाढीव दर ठरविण्याबाबत जिल्हा तांत्रिक समित्यांना मुभा राहणार आहे. मात्र राज्यस्तर समितीने ठरविलेल्या दरापेक्षा जिल्हा तांत्रिक समित्यांना पीक कर्जाचे दर कमी करता येणार नाही, असे निर्देश आहेत. (प्रतिनिधी)
राज्यस्तरीय समितीने
निश्चित केलेले पीककर्जाचे दर
खरीप ज्वारी (बागायत) २६ हजार रूपये, खरीप ज्वारी (कोरडवाहू) २४ हजार रुपये, तूर (बागायत) ३० हजार रूपये, तूर (कोरडवाहू) २८ हजार रूपये, मूग (जिरायती, उन्हाळी) प्रत्येकी १८ हजार रूपये, सोयाबीन ३६ हजार, कापूस (बागायत) ४४ हजार रूपये, कापूस (जिरायत) ३६ हजार रूपये, गहू (बागायत) ३३ हजार रूपये, हरभरा (बागायत) २७ हजार रूपये, हरभरा (जिरायत) २२ हजार रूपये असे हेक्टरी दर आहेत.