दर्यापुरात ४३ लाखांचा पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 10:30 PM2018-01-24T22:30:36+5:302018-01-24T22:31:01+5:30
दर्यापूर तालुका मुख्यालयानजीक बाभळी टी-पॉर्इंटवर बुधवारी पोलिसांनी नाकेबंदी करून एका ट्रकमधून तब्बल ४३ लाख ६८ हजार १३५ रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू (२७ लाख ६८ हजार १३५ रुपयांचा माल) जप्त केला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : दर्यापूर तालुका मुख्यालयानजीक बाभळी टी-पॉर्इंटवर बुधवारी पोलिसांनी नाकेबंदी करून एका ट्रकमधून तब्बल ४३ लाख ६८ हजार १३५ रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू (२७ लाख ६८ हजार १३५ रुपयांचा माल) जप्त केला. हा माल दिल्लीहून अकोला येथे जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माहितीच्या आधारे दर्यापूरचे ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी दर्यापूर-अंजनगाव मार्गावर नाकेबंदी करून वाहनांच्या तपासणी केली. ट्रक क्रमांक एचआर ३८ एक्स १२३६ ची तपासणी केली असता त्यात गुटख्याचे पोते दिसले. ट्रक जप्त करून ठाण्यात आणण्यात आला. ट्रकचालक राजू श्रीकृष्ण बघेल (२६) व अरुणसेन नथ्थासेन (२४,दोघेही रा. शिवपुरी मप्र.) यांना ताब्यात घेण्यात आले. माहितीवरून अन्न व औषधी प्रशानस विभागाचे अधिकारी राजेश यादव व विश्वजित शिंदे यांनी घटनास्थळ गाठून मालाची तपासणी केली. ट्रक पकडल्याची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी ठाण्यात गर्दी केली. ट्रकमधील अन्य मालाची चौकशी व्हावी, अशी मागणी लावून धारली. त्यात एका सुगंधी सिगारेटचे पाकिटे आढळली. जप्त केलेला ट्रक गौरव चावला यांच्या मालकीचा आहे. वृत लिहिस्तोवर अन्न व औषधी प्रशासन विभागाची कारवाई सुरू होती.
पोलिसांनी ट्रक व जप्त साहित्य असा ४३ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती दिली. ही कारवाई ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदशनाखाली पीएसआय रिना कोरडे, शरद सारसे, रितेश राऊत, बजरंग इंगळे, नीलेश गावंडे, प्रशांत ढोके यांनी केली.
असा मिळाला सिगारेटचा साठा
गुड्स गॅरेजच्या ट्रकमध्ये वस्तू होत्या. पोलिसांनी केवळ गुटख्याचे पोते बाहेर काढले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्येही गुटखा लपविल्याचा संशय व्यक्त करीत येथे जमलेल्या नागरिकांच्या आग्रहावरून इतर माल उघडायला लावला. यात पाच पोते सुगंधित सिगारेटचे बॉक्स आढळून आले. त्याची बिल्टीवरील किमंत १८ हजार आहे.
पकडलेला माल गुटखा नसून तो पानमसाला व सुंगंधित तंबाखू आहे. पाच बॉक्स सुगंधित सिगरेटस् जप्त करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्यांच्या मालकांना परत केल्या जातील.
- विश्वजित शिंदे,
अन्न व औषधी प्रशासन विभाग, अमरावती