’म्युकरमायकोसिस’ निदानासाठी चाचण्यांचे दर निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:11 AM2021-05-24T04:11:33+5:302021-05-24T04:11:33+5:30
अमरावती : ‘म्युकरमायकोसिस’च्या निदानासाठी आवश्यक चाचण्यांचे दर जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहेत. कमाल मर्यादा निश्चित केल्याने लक्षणे ...
अमरावती : ‘म्युकरमायकोसिस’च्या निदानासाठी आवश्यक चाचण्यांचे दर जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहेत. कमाल मर्यादा निश्चित केल्याने लक्षणे किंवा शंका असणाऱ्यांना निश्चित दरात चाचणी करून घेता येणार आहे. म्युकरमायकोसिस चाचणी दर नियंत्रणाचा निर्णय राज्यात प्रथमतः अमरावती जिल्ह्यात होत आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची सभा झाली. त्यात रेडिओलॉजी संघटना, ईएनटी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला. कारवाईसाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त सक्षम प्राधिकारी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
बॉक्स
असे आहेत चाचण्यांचे दर
'स्पेसिफिकेशन ऑफ एमआरआय पीएनएस ऑर्बिट अँड ब्रेन विथ गॅलोनिनियम कॉन्ट्रास्ट' या चाचणीसाठी सात हजार रुपये, 'स्पेसिफिकेशन ऑफ सिटी स्कॅन विथ कॉन्ट्रास्ट' या चाचणीसाठी पाच हजार रुपये, तर 'स्पेसिफिकेशन ऑफ सीटी स्कॅन विदाऊट कॉन्ट्रास्ट' या चाचणीसाठी तीन हजार रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. या रकमेत एमआरआय, सीटी स्कॅन तपासणी, सीटी फिल्म, पीपीई किट, डिसइन्फेक्टेड सॅनिटायझेशन दर व जीएसटीचा समावेश आहे. 'विथ कॉन्ट्रास्ट'मध्ये 'कॉन्ट्रास्ट मीडिया' व ते देण्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था याचा समावेश आहे.
बॉक्स
'प्रिस्क्रिप्शन'विना चाचणी नाही
एमआरआय, सीटी स्कॅन नियमित व तातडीच्या तपासणीसाठी हे दर लागू राहतील. हा आदेश लागू होण्यापूर्वी जर कुठल्याही रुग्णालय किंवा तपासणी केंद्रात याहून कमी दर असतील, तर मूळ कमी दरच लागू राहतील. चाचणी अहवालात चाचणी कोणत्या यंत्राद्वारे केली ते नमूद असणे आवश्यक आहे. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय चाचणी करू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यामनी दिले आहेत.
बॉक्स
दरांचा फलक दर्शनी भागावा लावणे अनिवार्य
चाचणी अहवाल स्पष्ट व आवश्यक तपशिलासह असावा, याची खबरदारी रेडिओलॉजिस्टने घ्यावी. एखाद्या रुग्णाकडे आरोग्य विमा असेल किंवा एखाद्या रुग्णालयाने तपासणी केंद्राशी करार केला असेल, तर हे दर लागू राहणार नाहीत. निश्चित केलेल्या दराचा फलक रुग्णालय किंवा तपासणी केंद्रात दर्शनी भागात लावावा. निश्चित दरांहून अधिक रक्कम आकारल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.