मंत्री बनण्यापेक्षा विरोधी पक्षनेता होईल
By admin | Published: November 27, 2015 12:29 AM2015-11-27T00:29:07+5:302015-11-27T00:31:17+5:30
अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ शकतात, तर मी महाराष्ट्राच्या विरोधीपक्षनेतापदी विराजमान का होऊ शकत नाही,
गणेश देशमुख अमरावती
अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ शकतात, तर मी महाराष्ट्राच्या विरोधीपक्षनेतापदी विराजमान का होऊ शकत नाही, असा उत्स्फूर्त प्रश्न राजकीय प्रश्नांवर चुप्पी साधणारे अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला. 'लोकमत'ने घेतलेल्या मुलाखतीत अनेक मुद्यांवर ते सडेतोड बोलले.
आमदार बच्चू कडू यांनी आठवडाभरापूर्वी भाला-कुराणी मोर्चा काढून अमरावती प्रशासनाला घामाघूम केले होते. प्रशासन-शासनाला नमते घेऊन त्यांच्या बहुअंशी मागण्या लागलीच मंजूरही कराव्या लागल्या, इतकी त्या मोर्चाची तीव्रता होती.
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी बच्चू कडू यांनी काढलेला हा आक्रमक मोर्चा सत्तासमावेशाच्या हेतूने प्रेरित होता काय, या प्रश्नावर उसळून ते म्हणाले, लाल दिव्यात या बच्चूला ना कधी रस होता ना कधी तो राहणार. मंत्रिपदच घ्यायचे असते तर शिवसेना केव्हाही द्यायला तयार होती. आमचे नाते शेतकऱ्यांच्या वेदनांशी आहे. सोयाबीन पेरणीचाही खर्च निघाला नाही, पाण्याअभावी तुरीच्या शेंगा भरत नाहीत, कपाशीवर लाल्या आला, कधी नव्हे ती संत्री लबालब आलीत; पण खरेदीला व्यापारी फिरकेना. स्थिती अशी कमालिची बिकट असताना, विरोधक म्हणून घसा फाडून ओरडणारे भाजप-सेनेवाले आता सत्तेत येताच मूग गिळून बसले आहेत. कुणी लोकप्रतिनिधी लढायला पुढे येत नाहीत. शेतकरी रोज गळ्याभोवती फास आवळतो. अशा स्थितीत हा बच्चू चूप कसा बसेल? शेतकऱ्यांची मुले आम्ही. शेतकऱ्यांसाठी लढू, शेतकऱ्यांसाठी मरू. आणि आक्रमकतेचे तुम्ही विचारता- अहो, आज प्रतिकात्मक भाले आणले. प्रशासन-शासनाने शेतकऱ्यांना छळणे थांबविले नाही तर उद्या अधिकारी-सत्ताधिकाऱ्यांना भाल्याच्या टोकावर घ्यायलाही मागे बघणार नाही आम्ही! शेतकऱ्यांसाठी आम्ही आक्रमक होत आलो आहोत आणि होत राहणार आहोत.
अपक्ष आमदारांच्या समुहात आपण नाहीत काय, या प्रश्नावर ते उत्तरले- नाही. मुळीच नाही. कळपाने राहणे मला आवडत नाही. हां, कळप जर सिंहांचा असेल तर नक्कीस सोबत करेन.
अपक्ष आमदारांनी सोबत राहण्याची विनंती केली नव्हती काय, यावर बच्चू कडू सांगतात- केली होती ना. आम्ही विचारले त्यांना कशासाठी राहायचे एकजुटीने? शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, सामान्यांच्या न्यायासाठीचा असेल उद्देश तर देऊ आम्ही साथ; पण उद्देशच सांगू शकले नाहीत ते आम्हाला. पुढची बातच रद्द.
चांदूरबाजारच्या पालिका निवडणुकीत स्वकियांनीच त्यांच्याशी दगा केला. ती खपली काढली नि आक्रमक बच्चू कडू गंभीर झाले. म्हणाले, होय झाला आमचा पराभव. आम्ही स्वीकारतोही तो. पगारी नोकर असलेल्यांनी केवळ सत्तेच्या मोहापायी दगा केला. वाईट वाटते अशावेळी. आम्ही काय शिकवितो आणि असे लोक काय शिकतात? कार्यकर्ता सत्तेसाठी 'प्रहार' सोडत असेल तर मन जळतेच. संतापही येतो. कशासाठी करतो आहोत आपण हा अट्टाहास, असा सवालही मनाला भिडून जातो; पण पुन्हा आठवते ती रुग्णांची अव्याहत सेवा, शहिदांच्या गावची वारी, अपंगांच्या न्यायासाठीचा संघर्ष- मनावरची मळभ क्षणात झटकली जाते. उमेद तरारून उभी ठाकते. जुन्याच जोशाने आम्ही पुन्हा कामाला लागतो. हे असले एक-दोन भगोडे सेवाकार्याच्या अव्याहत यज्ञाला भेदू शकतात काय? छे! मुळीच नाही.
राधाकृष्ण विखे पाटलांचा आवाज सभागृहात पोहोचत नाही. ते बोलायला उभे राहतात त्यावेळी ३५ सदस्य सभागृहात असतात. ज्यांचा आवाज सभागृहातच पोहोचू शकत नाही त्यांचा आवाज राज्यभरात कसा पोहोचेल?
सत्तेत असलेले भाजप सेनेवाले विरोधातच शोभतात. त्यांची भांडणे मनोरंजनाचा खेळ आहे. सत्ता चालविण्याइतपत प्रभाव त्यांचा निर्माण झालेला नाही. मुख्यमंत्री विरोधात असताना आक्रमक होते अन् प्रभाविही! मंत्रिमंडळाचे प्रमुख होताच ते निष्प्रभ झाले आहेत. राज्यभरात चिंतेचे वातावरण आहे. या दोहोंच्या अशा विचित्र स्थितीने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची जबाबदारी आम्ही आमच्या परीने पार पाडतो आहे. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांत असलेल्या प्रहारच्या शाखांना आम्ही तसे आवाहनच केले आहे. दाव्याने सांगतो, दिल्लीत रुग्णांची व्यवस्था करायची असेल तर, सारी यंत्रणा असूनही मुख्यमंत्री करू शकणार नाही, ती सर्व व्यवस्था आम्ही सत्तेबाहेर असून करू शकतो. आमची नाळच वेदनांशी जुळली आहे. 'सरफिऱ्यां'ची सारी फौजच उभी आहे अशा कामांसाठी.
एकीकडे भाजपला तुम्ही दूषण देता आणि भाजप सरकारातच राज्यमंत्री असलेल्या प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात बरेचदा भेट देता. तुमचे नाव मंत्रिपदाच्या चर्चेत आहे. ना.पोटे त्यासाठीचा दुवा तर नव्हे ना? या प्रश्नावर बच्चू कडू जाम उसळले. मंत्रिपदासाठी पोटे यांची मदत घेण्याची गरज पडावी इतके वाईट दिवस आले नाहीत आमचे. अहो पुन्हा सांगतो, मंत्रिपद धावत येते आमच्याकडे. आम्ही फक्त इशारा द्यायची देरी आहे; पण नकोच आहे ना आम्हाला मंत्रिपद.
राहिली गोष्ट प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात जाण्याची तर ते मंत्री होण्यापूर्वीपासून अन् भाजपक्षात जाण्यापूर्वीपासूनचे माझे मित्र आहेत. असतील ते पालकमंत्री. असतील भाजपात. आम्हाला काय त्याचे. मनात आले की जातो आम्ही त्यांना भेटायला.