‘पॉस’द्वारे रेशन वितरण सुरु
By admin | Published: January 19, 2017 12:16 AM2017-01-19T00:16:06+5:302017-01-19T00:16:06+5:30
जिल्ह्यातील शिधापत्रिका आता ‘आॅनलाईन’ करण्यात आल्या आहेत व त्याच्याशी आधार बँक खाते संलग्न करण्यात आले आहे.
‘आॅनलाईन’ व्यवहार : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या हस्ते तिवस्यात शुभारंभ
तिवसा : जिल्ह्यातील शिधापत्रिका आता ‘आॅनलाईन’ करण्यात आल्या आहेत व त्याच्याशी आधार बँक खाते संलग्न करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुरवठा विभागाद्वारे ‘पॉस’ (पाऊंट आॅफ सेल) या उपकरणाद्वारे रेशनधान्य वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील वाढोणा व शेंदूरजना खुर्द येथे जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे हस्ते मंगळवारी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे नीमा माहोरे व वाढोणा येथे शांता राठोड यांच्या सरकारी स्वस्त धान्य दुकानात ‘पॉस’ उपकरणाची संगणकीय प्रणालीची जोडणी करुन लाभार्थ्यांना या प्रणालीद्वारे धान्य वितरण करण्यात आले. जीपीआरएस प्रणाली सोबत कनेक्ट असणाऱ्या पॉश मशीनद्वारे ज्या ग्राहकाला धान्य द्यायचे आहे त्या ग्राहकाला अंगठा द्यावा लागणार आहे. धान्याचे वाटप तसेच दर व झालेली किंमत याची माहिती मशीनद्वारे उपलब्ध होते. तसेच दुकानामध्ये महिना अखेरीस किती धान्य शिल्लक आहे, याची माहिती पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी डि.के. वानखडे व तहसीलदार राम लंके यांनी उपस्थित लाभार्थ्यांना या प्रणालीची माहिती दिली. येत्या ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानामधील व्यवहार याच पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी रणवीर, सहाय्यक अधिकारी फुलझेले, पुरवठा शाखेचे अव्वल कारकून नरेंद्र कुरळकर, पुरवठा निरीक्षक वैशाली यादव तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच व लाभार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अशी मिळते माहिती
या ‘पॉस’ उपकरणाद्वारे रेशन दुकानाला किती धान्याचा कोटा मिळाला, ग्राहकांना किती धान्याचे वाटप करण्यात आले व महिन्याअखेर दुकानात किती धान्य शिल्लक आहे, याची माहिती आॅनलाईनरित्या संकेतस्थयावर नोंदविल्या जाणार आहे.