अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात कुंभकर्णासमोर होते रावणाचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 04:52 PM2018-10-16T16:52:21+5:302018-10-16T16:54:29+5:30
ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अचलपुरात कुंभकर्णाची निद्रिस्त अवस्थेतील सुमारे चारशे वर्षांपूर्वीची मूर्ती आहे. दसऱ्याला या मूर्तीपुढे रावण दहनानंतर कुंभकर्णाला सोने वाहण्याची परंपरा आहे.
संतोष ठाकूर/अमरावती
लोकमत न्यूज नेटवर्क
ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अचलपुरात कुंभकर्णाची निद्रिस्त अवस्थेतील सुमारे चारशे वर्षांपूर्वीची मूर्ती आहे. दसऱ्याला या मूर्तीपुढे रावण दहनानंतर कुंभकर्णाला सोने वाहण्याची परंपरा आहे.
अचलपुरातील पंचबुरूज कालीमाता गेटजवळील बुंदेलपुरा येथे ५० फूट लांब व २० फूट रुंदीचा कुंभकर्ण आहे. नग्न व निद्रावस्थेतील हा कुंभकर्ण पूर्वी माती-विटांचा होता. मात्र, अलीकडे त्याला सिमेंट-रेतीचे प्लास्टर चढविले गेले आहे. रंगरंगोटीसुद्धा करण्यात आली आहे. संपूर्ण भारतात एवढी मोठी ही कुंभकर्णाची एकमेव मूर्ती आहे. या मूर्तीलगत दसरा मैदान आहे. त्यामुळे दसऱ्याला कुंभकर्णाच्या पुढ्यातच रावणाचे दहन केले जाते. ही बहुदा भारतातील एकमेव घटना होय.
सुमारे ४०० वर्षांपूर्वीची ही मूर्ती वारा, पाऊस, ऊन झेलत आहे. या नग्न कुंभकर्णाचा इतिहास अज्ञात आहे. मात्र, दसऱ्याच्या दिवशी या कुंभकर्णाची साफसफाई व डागडुजी करण्यात येते. बुंदेलपुरा निवासी नागरिक ही साफसफाई करतात. रावण दहनाला उपस्थित नागरिक दसऱ्याला कुंभकर्णाला सोनं वाहतात.