रवि राणा संतापले, विकासकामे रोखल्यास खैर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:31+5:302021-07-02T04:10:31+5:30
अमरावती : कुणाच्या राजकीय दबावाने बडनेरा मतदारसंघातील विकासकामे रोखल्यास आता संबंधितांची खैर नाही, अशी तंबी वजा इशारा आमदार रवि ...
अमरावती : कुणाच्या राजकीय दबावाने बडनेरा मतदारसंघातील विकासकामे रोखल्यास आता संबंधितांची खैर नाही, अशी तंबी वजा इशारा आमदार रवि राणा यांनी गुरुवारी येथे दिला. यावेळी महापालिका आयुक्तांसह विभाग प्रमुखांचाही त्यांनी विविध मुद्द्यांवर क्लास घेतला.
राजापेठ उड्डाणपूल निर्मितीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. या पुलाची निर्मिती दाेन वर्षात होणे अपेक्षित होते. मात्र, पाच वर्षाचा कालावधी झाला असताना अद्यापही राजापेठ उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. छत्री तलाव आणि बेलपुऱ्याकडे जाणाऱ्या मार्गाचे बांधकाम रखडल्याने आमदार राणा प्रचंड संतापले. कुणाच्या पत्राने हे थांबविले, ते पत्र मला द्या, असा सवाल त्यांनी महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना केला. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. राजापेठ उड्डाणपुलाची निर्मिती वेळेत न केल्यामुळे कंत्राटदार चाफेकर यांच्याकडे असलेल्या २९ लाख रुपयांच्या निधीचा मुद्दा आ. राणांनी उपस्थित केला. प्रतिवर्ष पाच लाख रुपये याप्रमाणे शंकरनगर येथील स्मशानभूमी जागेच्या वापरासाठीची रक्कम वसूल करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. बडनेरा मतदारसंघात विकासासाठी आलेल्या पाच कोटींचा निधी अमरावतीत कसा वळविला, यावरून आ. राणांनी प्रश्नांची सरबत्ती केली. महापालिका प्रशासनाने कुणाच्या दबावामुळे फाईलवर ‘रामायण’ लिहिले, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी सुनील राणा, नगरसेविका सुमती ढोके, शिक्षण सभापती आशिष गावंडे, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, संजय हिंगासपुरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
००००००००००००००००००००००००
छत्री तलाव परिसरात डीपीआरनुसार कामे नाही
छत्री तलाव सौंदर्यीकरणात विकास आराखड्यानुसार कामे होत नसल्याचा आक्षेप आमदार रवि राणा यांनी घेतला. आतापर्यंत येथे झालेल्या विकासकामांचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ऑडिट करावे, असा नवा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे छत्री तलाव सौंदर्यीकरणात महापालिकेने केलेली विकासकामे व्यवस्थित नाहीत, असा सूर आमदारांचा होता.
---------------------
या मुद्द्यांवरही झाली चर्चा
- बडनेरा येथील फिश हब
- प्रसाधनगृह निर्मिती
- अकोली वळण रिंग राेडवरील अतिक्रमण
- महानगरातील स्वच्छता
- सुकळी येथील कम्पोस्ट डेपोवर दंड आकारणी
------------------
कोरोना मृतदेहांच्या वाहतुकीचेही पैसे घेतले
अमरावती शहरात आतापर्यंत ५४७ कोरोनाने बळी घेतले. या कोरोना मृतदेहांचे अंत्यसंस्कार आणि दवाखाना ते स्मशानभूमी या दरम्यान वाहतूक करण्याचे महापालिका प्रशासनाने पैसे घेतले, असा आरोप आमदार रवि राणा यांनी केला. याबाबत व्हिडीओ क्लिप असल्याचा दावाही त्यांनी केला.
--------------------
खासगी बँकेत शासननिधी जमा का?
केंद्र अथवा राज्य शासनाकडून विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो. ही विकासकामे ठरावीक कालावधीत होणे अपेक्षित असते. मात्र, महापालिकेतील अधिकारी हे विशिष्ट कालावधीत ही कामे पूर्ण करीत नाहीत. दोन ते तीन वर्षे विलंबाने ही कामे होतात आणि शासननिधी हा खासगी बँकेत ठेवतात. या निधीचे मिळणारे व्याज काही टक्के अधिकाऱ्यांनाही मिळते, असा आरोप आमदार रवि राणा यांनी केला. तेव्हा अनेक अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या.
-----------------------