रवी राणा यांना ट्रान्झिट अटकपूर्व जामीन; दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 08:02 PM2022-02-21T20:02:38+5:302022-02-21T20:03:14+5:30
Amravati News नवी दिल्ली येथील पटियाला जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा यांना आठवडाभराचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
अमरावती : नवी दिल्ली येथील पटियाला जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा यांना आठवडाभराचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी आमदार रवी राणा व अन्य १० जणांविरुद्ध ९ फेब्रुवारी रोजी भादंविचे कलम ३०७ व अन्य कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवारदेखील होती. दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी त्यांना ‘ट्रान्झिट ॲन्टिसिपेट्री बेल’ मंजूर करण्यात आल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने त्यांना एक आठवड्यासाठी ट्रान्झिट जामीन मंजूर केला असल्याने या कालावधीत त्यांना राजापेठ पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज सादर करता येणार आहे. स्थानिक पोलिसांना त्यांना या कालावधीत अटक करता येणार नाही. पोलिसांनी कुहेतूने व राजकीय दबावापोटी दाखल केलेला एफआरआर स्क्वॅश करण्यासाठी आपण मंगळवारी नागपूर येथे जात असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी सोमवारी दिली. सोबतच आपण नागपूर खंडपीठात मानहानी दाव्याचा अर्जदेखील करणार असल्याचे त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओतून स्पष्ट केले आहे.
राजापेठ अंडरब्रिज परिसरात ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते १.१५ च्या सुमारास महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली होती. आपल्यावर जीवघेणा हल्ला चढविण्यात आला, अशी तक्रारदेखील आष्टीकर यांनी नोंदविली होती. गुन्हा दाखल झालेल्या ११ पैकी ५ जणांना घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली. तर अन्य एक आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर पोलिसांच्या लेखी आ. रवी राणा, तीन महिला व अजय मोरय्या यांना अटक झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आ. राणा यांनी पटियाला न्यायालयाकडे ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मागितला होता. त्यावर सुनावणी होऊन सोमवारी त्यांना प्रवासासाठी अटकपूर्व जामीन मिळाला.
मला अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे समजल्याने दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात अर्ज दिला. त्या न्यायालयाने सोमवारी मला आठवडाभराचा ट्रान्झिट जामीन मंजूर केला. त्या जामिनावर मंगळवारी नागपूर न्यायालयात जाणार आहे.
रवी राणा, आमदार, बडनेरा
आमच्यापर्यंत तशी कुठलीही ऑर्डर पोहोचलेली नाही. त्यामुळे ट्रान्झिट जामीन मिळाला की कसे, यावर भाष्य करता येणार नाही.
भारत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त, अमरावती