रवी राणा यांनी दिला सामाजिक कृतज्ञतेचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:42 PM2019-04-15T23:42:01+5:302019-04-15T23:42:15+5:30
नजीकच्या शिराळा पुसदा येथे रविवारी रात्री ८.३० वाजता अचानक चार घरांना आग लागली. या आगीत सहा जनावरे होरपळली, तर दोघे जण गंभीररित्या भाजले. घरांसह साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी आगग्रस्तांना सर्वप्रथम भेट देत सामाजिक कृतज्ञतेचा परिचय दिला. पुसदा हे वलगावनजीक गाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नजीकच्या शिराळा पुसदा येथे रविवारी रात्री ८.३० वाजता अचानक चार घरांना आग लागली. या आगीत सहा जनावरे होरपळली, तर दोघे जण गंभीररित्या भाजले. घरांसह साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी आगग्रस्तांना सर्वप्रथम भेट देत सामाजिक कृतज्ञतेचा परिचय दिला.
पुसदा हे वलगावनजीक गाव आहे. पुसदा येथे रविवारी रात्री अचानक चार घरांना आग लागली. हवेला वेग असल्याने एका घराला लागलेली आग चार घरांपर्यंत पोहोचली. ग्रामस्थांनी त्यांच्या पद्धतीने घरांना लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे सदस्य प्रकाश साबळे यांच्या माहितीवरून अग्निशमन वाहनांना घटनास्थळी येऊन आग विझविली. सुमारे दीड तास चाललेल्या आगीत सहा जनावरे होरपळली. या घटनेत आगग्रस्त चारही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. शेख कलाम शेख सलाम आणि शेख बशीर शेख गफ्फार हे दोघेही भाजले.
दरम्यान, सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पुसदा येथे आ. रवी राणा यांनी आगग्रस्त घरांना भेट दिली. त्यांची आस्थेने विचारपूस करताना आ. राणा यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शासनाकडे तात्काळ पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास आगग्रस्तांना दिला.
शेख बशीर शेख गफ्फार, शेख कलाम शेख सलाम, अजय इंगोले व दादाराव कडू या चारही आगग्रस्तांची भेट घेत आ. राणा यांनी सांत्वन केले. आगीच्या घटनेनंतर आगग्रस्तांची व्यथा जाणून घेण्यासाठी आ. रवी राणा हे पुसदा येथे पोहोचणारे पहिले लोकप्रतिनिधी ठरले, अशी भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. यावेळी आ. राणा यांच्यासह मुकुंदराव देशमुख, प्रकाश साबळे, राजेंद्र भुयार, संजय काळे, वैभव सोलव, गणेश कडू, शिल्पा इंगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार रवी राणा यांच्या भेटीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.