रुग्णालयातील निकृष्ट जेवणाबाबत रवी राणा यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी
By उज्वल भालेकर | Published: June 26, 2023 06:19 PM2023-06-26T18:19:26+5:302023-06-26T18:19:58+5:30
Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध समस्या पाहून आमदार रवी राणा यांनी संबधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
उज्वल भालेकर
अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध समस्या पाहून आमदार रवी राणा यांनी संबधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. रुग्णालयात रुग्णांचे होणारे हाल पाहून आपण आमदार असल्याची लाज वाटत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचा आरोप करत तेच जेवण संबधित अधिकाऱ्यांना भरवून राणा यांनी संताप व्यक्त केला.
आमदार रवी राणा यांनी सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट घेत रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता, औषधांचा तुटवडा, एका बेडवर दोन रुग्ण, रुग्णांना मिळणारे निकृष्ट दर्जाचे जेवण, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अशा विविध समस्यांचा डोंगर पाहून संताप व्यक्त केला. दोन महिन्यांपूर्वीच राणा यांनी रुग्णालयाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना विविध समस्यांचे प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले होते. परंतु दोन महिन्यानंतरही रुग्णालयातील समस्या कायम असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून त्यांनी कर्मचाऱ्यांची विचारणा केली. यावेळी फक्त १४ स्वच्छता कर्मचारीच कर्तव्यावर असल्याचे आढळून आले. यानंतर औषधांचाही मुद्दा उपस्थित केला. त्याच बरोबर रुग्णांना मिळणारे जेवण त्यांनी मागवून करपलेली पोळी व निकृष्ट दर्जाची डाळ संबधित अधिकाऱ्यांना भरवून चांगलेच धारेवर धरले. ही भेट माणुसकीची आहे, परंतु यानंतरही जर रुग्णालयातील समस्या कायम राहिल्या तर अधिकाऱ्यांना झोडपल्या शिवाय राहणार नसल्याचेही आमदार राणा म्हणाले.