बच्चू कडूंसोबतचा वाद आता संपलेला आहे - रवी राणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 04:18 PM2022-11-01T16:18:29+5:302022-11-01T16:25:56+5:30
बच्चू कडू यांच्या भाषणानंतर रवी राणांची प्रतिक्रिया
अमरावती : माझा बच्चू कडूंबोसतचा वाद आता संपलेला आहे. लोकशाहीत असं घडत असतं, असे विषय संपवून पुढे जायला हवं असं आमदार रवी राणा म्हणाले. शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न, बेरोजगारीसंबंधी प्रश्नासाठी आता काम करायचयं, असंही त्यांनी नमूद केलं. आज अमरावतीत प्रहार संघटनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात बच्चू कडूंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली.
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेत असल्याचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर बच्चू कडूंच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागून होतं. आज प्रहारच्या मेळाव्यात बोलताना बच्चू कडू यासंदर्भात आपली भूमिका मांडली. पहिली वेळ आहे म्हणून माफ केलं पुढच्यावेळेस माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. प्रहार हा काही आंडूपाडूंचा पक्ष नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही आणि गेलो तर कोथळा काढतो, असंही कडू म्हणाले.
Bachchu Kadu: मै झुकेगा नहीं! पहिली वेळ होती, पण पुन्हा माफी नाही; बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका
"रवी राणांनी झालेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्ती केली त्याचा मी आनंद व्यक्त करतोय. नाहीतर उगाच आम्हाला हातपाय हलवायला लागले असते. त्यांनी मोठेपणा घेतला आणि त्यांना आपली चूक लक्षात आली. तुम्ही दोन पावलं मागे घेतली तर आम्ही चार पावलं मागे घेऊ. आम्हाला आमची एनर्जी अशा कामात वाया घालवायची नाही. त्यामुळे हा विषय आता संपला आहे आणि राज्यातील कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या कामासाठी वेळ सत्कारणी लागावा यासाठी आम्ही झटत राहू", असं बच्चू कडू म्हणाले.
यानंतर, रवी राणा यांनी आमच्यातील वाद आत संपला असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. माझ्या विरोधात ५० उमेदवार उभे राहतात. किती जरी उमेदवार उभे राहिले. तरी जनता माझ्यासोबत आहे. जनेतेचा आशिर्वाद ज्याच्यावर असतो, तोच जिंकून येतो असंही रवी राणा म्हणाले.