बडनेरातून रवी राणांची उमेदवारी जाहीर; भाजपचा एक गट अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 01:11 PM2024-10-23T13:11:16+5:302024-10-23T13:12:53+5:30

Amravati : उपमुख्यमंत्र्यांकडून हिरवी झेंडी; महाविकास आघाडीचे ठरेना

Ravi Rana's candidature announced from Badnera; A group of BJP is upset | बडनेरातून रवी राणांची उमेदवारी जाहीर; भाजपचा एक गट अस्वस्थ

Ravi Rana's candidature announced from Badnera; A group of BJP is upset

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे सलग तीनदा प्रतिनिधित्व करणारे आमदार रवी राणा यांना मंगळवारी युवा स्वाभिमान पार्टीने बडनेरातून उमेदवारी जाहीर केली आहे, तर आपल्या उमेदवारीला महायुतीच्याच नेत्यांनी हिरवी झेंडी दाखविली असल्याचा दावा खुद्द राणा यांनी केल्याने भाजपचा एका गट प्रचंड अस्वस्थ आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते मतदारसंघात ठाण मांडून आहेत. मात्र, महाविकास आघाडी वा अन्य पक्षांकडून अद्यापही बडनेरातून कोण? याबाबत निर्णय झालेला नाही, हे विशेष. 


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतून बडनेरा मतदारसंघ हा युवा स्वाभिमान पार्टीच्या वाट्याला जाईल, असे संकेत दीड महिन्यापूर्वी दिले असल्याचे राणा यांनी सांगितले होते. त्यामुळे भाजपने जाहीर केलेल्या यादीत बडनेराचा समावेश नव्हता. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार मित्रपक्षाच्या सीटिंग आमदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय अगोदरच झाला आहे. त्यामुळे भाजपमधून काहीजण बडनेरातून दावेदारी करीत असले तरी ही जागा रवी राणा यांना सोडण्यात येणार आहे, हे जवळपास निश्चित आहे; परंतु बडनेरातून महाविकास आघाडीतून उमेदवारी कुणाला, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेसुद्धा बडनेरात दावा केला आहे. 


म्हणूनच प्रचार सुरू केला 
महायुतीतून बडनेऱ्याची जागा आमदार रवी राणा यांना देण्याचा निर्णय गत दोन महिन्यांपूर्वीच झाला आहे. त्यामुळे युवा स्वाभिमान पार्टीने बडनेरा मतदारसंघाची सूक्ष्म बांधणी केली आहे. शहरी, ग्रामीण अशा दोन टप्प्यात प्रचाराची रणनीती आखली जात आहे. उमेदवारी पक्की असल्यामुळे आम्ही निश्चत आहोत, असे युवा स्वाभिमान पार्टीचे प्रवक्ता गणेशदास गायकवाड यांनी सांगितले. निवडणूक आता जाहीर झाली असली तरी महिला, युवकांचे मेळावे फार पूर्वीपासून घेण्यात येत आहेत. विकासाच्या बळावरच युवा स्वाभिमानची वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.


वायएसपींकडून चौथ्यांदा संधी 
बडनेरा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी रवी राणा यांनी ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीकडे अर्ज दाखल केला होता. त्याअनुषंगाने बडनेरातून चौथ्यांदा राणांना उमेदवारी देण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतल्याची माहिती वायएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष नीळकंठ कात्रे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली. राणा यांच्या अर्जावर संसदीय समितीने प्रस्ताव मांडून एकमताने संमती दिली. यावेळी पत्रपरिषदेला जयंत वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, कमलकिशोर मालाणी, विनोद जायलवाल, संजय मुनोत, शिवदास घुले, सत्येंद्रसिंग लोटे, गणेशदास गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Ravi Rana's candidature announced from Badnera; A group of BJP is upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.