महायुतीतून बडनेरात रवी राणांकडून उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:56 AM2024-09-11T10:56:57+5:302024-09-11T10:58:10+5:30
Amravati : जागा वाटपाचा पत्ता नाही; देवेंद्र फडणवीसांनी हिरवी झेंडी दिल्याचा दुजोरा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती वा महाविकास आघाडीत जागा वाटपाचे सूत्र ठरले नाही. मात्र, आमदार रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघातून महायुतीचे आपणच उमेदवार, तशी हिरवी झेंडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा दुजोरा मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला. आ. राणा यांचा दावा महायुतीतील इच्छुकांना 'जोर का झटका...' मानला जात आहे.
विधानसभा निवडणुका वेळेवर होतील, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. त्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मार्चेबांधणी चालविली असून 'मेरीट' उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी महायुतीत घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पार्टीला बडनेरा मतदारसंघ वाट्याला येणार आहे. मीच उमेदवार असेल. माझ्या उमेदवारीला भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार देत हिरवी झेंडी दिल्याचा दावा आमदार रवि राणा यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर महायुतीतून विधानसभेसाठी पाच ते सहा जागांच्या मागणीचा प्रस्तावही दिल्याचे ते म्हणाले. भाजपने बडनेरा मतदारसंघावर दावा केला नाही, तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी ज्या २५ जागा मागितल्या, त्यामध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, असे आ. राणा यांनी सांगितले. परंतु, महायुतीत जागा वाटपाची चर्चा नाही. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांमध्ये उमेदवारीबाबत कोणतीही बोलणी नाही. असे असताना आमदार रवी राणा यांनी बडनेन्ऱ्यातून स्वतःच उमेदवारीवर दावा ठोकल्याने महायुतीत 'ऑल वेल' नाही, असे संकेत मिळत आहेत.
भाजप, शिंदेसेना इच्छुकांचे काय?
बडनेरा मतदारसंघातून रवि राणा यांनी महायुतीतून उमेदवारी जाहीर केली. त्यापूर्वी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना मिळालेल्या २६ हजार ७६३ मताधिक्यांचा आधार घेत बडनेरातून भाजप आणि शिंदे सेना इच्छक उमेदवारांकडून दावेदारी केली जात होती. मात्र, आता राणांच्या या निर्णयामुळे भाजप, शिंदेसेनेची दावेदारी कागदावर तर नाही ना, याविषयी जोरदार चर्चा होत आहे.