रवि राणा यांचे शक्तिप्रदर्शन, ढोल ताशांच्या गजरात पायदळ रॅलीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 05:00 AM2022-02-25T05:00:00+5:302022-02-25T05:00:55+5:30
राजापेठ पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त डॉ. आष्टीकर यांच्यावर शाईफेक, जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी आमदार रवि राणांसह ११ जणांवर गुन्हे दाखल केले. मी पसार नाही तर दिल्ली येथे कामानिमित्त असल्याचा दावा करणारे आमदार राणा यांनी गुरुवारी अमरावतीत दमदार एन्ट्री केली. युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते, चाहत्यांची गर्दी हे जणू त्यांचे शक्तिप्रदर्शन होते. राणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. यावेळी राणांचे औक्षण करून स्वागत झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक प्रकरणात ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल असलेले बडनेऱ्याचे आमदार रवि राणा हे तब्बल १५ दिवसांनंतर गुरुवारी शहरात दाखल होताच त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. येथील इर्विन चौकात ढोल-ताशांच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांचा वर्षाव करून युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून आमदार राणांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
राजापेठ पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त डॉ. आष्टीकर यांच्यावर शाईफेक, जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी आमदार रवि राणांसह ११ जणांवर गुन्हे दाखल केले. मी पसार नाही तर दिल्ली येथे कामानिमित्त असल्याचा दावा करणारे आमदार राणा यांनी गुरुवारी अमरावतीत दमदार एन्ट्री केली. युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते, चाहत्यांची गर्दी हे जणू त्यांचे शक्तिप्रदर्शन होते. राणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. यावेळी राणांचे औक्षण करून स्वागत झाले. त्यानंतर राणा हे कार्यकर्त्यांसह पायी रॅलीद्वारे जयस्तंभ चौकाकडे निघाले. येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना संबाेधित करताना आमदार राणांना अचानक भोवळ आली. लगेच त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कालांतराने राणा यांनी रुग्णालयातून सुटी घेतली.
गाडगेनगर, नांदगाव पेठ, वलगाव पोलीस बंदोबस्त
आमदार रवि राणा हे गुरुवारी येथील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या गर्दीच्या अनुषंगाने गाडगेनगर, नांदगाव पेठ, वलगाव ठाण्यांचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. शहर गुन्हे शाखेचे पथकही नजर ठेवून होते.