रवी राणा यांचे शक्तिप्रदर्शन; ढोल-ताशांच्या गजरात काढली रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 09:40 PM2022-02-24T21:40:19+5:302022-02-24T21:42:46+5:30
Amravati News बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे तब्बल १५ दिवसांनंतर गुरुवारी शहरात दाखल होताच त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
अमरावती : महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेक प्रकरणात ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल असलेले बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे तब्बल १५ दिवसांनंतर गुरुवारी शहरात दाखल होताच त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. येथील इर्वीन चौकात ढोल-ताशांच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांचा वर्षाव करून युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून आमदार राणांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
राजापेठ पोलिसांनी ९ फेब्रुवारी २०२२ रोजी महापालिका आयुक्त डॉ. आष्टीकर यांच्यावर शाई फेक, जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर नऊ प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या नोंदी आमदार रवी राणा हे पसार आहेत. मात्र, मी पसार नाही तर दिल्ली येथे कामानिमित्त असल्याचा दावा करणारे आमदार रवी राणा यांनी गुरुवारी अमरावतीत दमदार एन्ट्री केली. युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते, चाहत्यांची गर्दी जणू आमदार रवी राणा यांचे शक्तीप्रदर्शन होते, असे चित्र पायदळ रॅलीत अनुभवता आले. आमदार राणा यांनी इर्वीन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार राणांचे औक्षण करून स्वागत झाले. त्यानंतर आमदार राणा हे कार्यकर्त्यांसह पायदळ रॅलीद्धारे जयस्तंभ चौकाकडे निघाले. येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना संबाेधित करताना आमदार राणांना अचानक भोवळ आली. लगेच त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कालांतराने राणा यांना सुटी देण्यात आली. यावेळी कार्यकर्ते, समर्थकांची माेठी गर्दी झाली हाेती, हे विशेष.
गाडगेनगर, नांदगाव पेठ, वलगाव ठाण्यांचा पोलीस बंदोबस्त
आमदार रवी राणा हे गुरुवारी येथील इर्वीन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला होता. बहुप्रतीक्षेनंतर आमदार राणा येत असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी जमणार, हे पोलिसांना अपेक्षित आहे. त्यानुसार गाडगेनगर, नांदगाव पेठ, वलगाव ठाण्यांचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शहर गुन्हे शाखेचे पथकही नजर ठेवून होते.
----------------------