रवि राणांचा भाजपला शह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 05:00 AM2021-07-04T05:00:00+5:302021-07-04T05:00:38+5:30
शनिवारी हा अंडरपास हार-फुलांनी सजविण्यात आला होता. ढोल-ताशांच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली. आ. रवि राणा केशरी दुपट्टा परिधान शेकडो कार्यकर्त्यांसह लोकार्पणासाठी जात असताना परिसरातील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. पाच वर्षांपासून मार्गाच्या बांधकामावर चौकीदारी करणारे ७७ वर्षीय भाऊराव डोंगरे व शाळकरी विद्यार्थ्याच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुप्रतीक्षित राजापेठच्या रेल्वे अंडरपासचे वृद्ध आणि शाळकरी विद्यार्थ्याच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. आमदार रवि राणा यांनी या राजकीय खेळीने भाजपला शह दिला तसेच पुन्हा एकदा नागरिकांचे लक्ष आपल्याकडे वळविले. महापौर चेतन गावंडे यांनी या अंडरपासचे लोकार्पण लवकरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे शुक्रवारीच जाहीर केले होते, हे विशेष.
बडनेरा विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या आड कुणी येत असेल, तर त्याला आडवे करू, अशी जाहीर तंबी देणारे आमदार राणा यांनी शनिवारी ‘हम है राणाजी’ हे दाखवून दिले. शुक्रवारीच त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत अंडरपासची पाहणी केली. शनिवारी हा अंडरपास हार-फुलांनी सजविण्यात आला होता. ढोल-ताशांच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली. आ. रवि राणा केशरी दुपट्टा परिधान शेकडो कार्यकर्त्यांसह लोकार्पणासाठी जात असताना परिसरातील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण केली. पाच वर्षांपासून मार्गाच्या बांधकामावर चौकीदारी करणारे ७७ वर्षीय भाऊराव डोंगरे व शाळकरी विद्यार्थ्याच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. बल्लू जव्हेरी, सुनील राणा, जयंतराव वानखडे, जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, शैलेंद्र कस्तुरे, आशिष गावंडे, सुमती ढोके, ज्योती सैरिसे, नितीन बोरेकर, अजय मोरया, अजय गाडे, संजय मोहोड, संदीप गुल्हाने, प्रवीण सावळे, अनुप अग्रवाल, अभिजीत देशमुख, सचिन भेंडे, विनोद गुहे, पराग चिमोटे, सुरज मिश्रा आदी उपस्थित होते.
मी जनतेचा आमदार आहे. जनहितासाठी सदैव लढणार आहे. हा मार्ग राजकीय-प्रशासकीय अडथळ्यांमुळे रखडला होता. आज नागरिकांच्या सेवेत मार्ग खुला करताना अत्यानंद होत आहे. हा अविस्मरणीय सुवर्णक्षण आहे.
- रवि राणा, आमदार