रब्बी हंगामात कृषीपंपाची वीज कापली तर फटके मारू, रविकांत तुपकर यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 08:31 PM2021-11-07T20:31:09+5:302021-11-07T20:31:40+5:30
सोयाबीनची आयात थांबविण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी आंदोलन...
अमरावती - विदर्भात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असून अतिपावसाने ते खराब झाले आहे. कापसाचे पीकही हातातून गेले आहे. उत्पादनखर्चही निघणे कठीण झाले आहे. ती तूट भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात कृषीपंपाची वीज कापण्यास येणाऱ्या अधिकाऱ्यांना फटके मारू, असा निर्वाणीचा इशारा शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी दिला. ते पत्रपरिषदेत बोलत होते.
१२ नोव्हेंबर रोजी आंदोलन -
यंदा सोयाबीन, कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकरी उत्पादन खर्चाच्या निम्मेच उत्पादन झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यांना विम्याची रक्कम खात्यात जमा करा, सोयाबीनची आयात थांबवा, खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवा व संत्रा उत्पादकांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या. अशा मागण्या करत शेतकरी स्वाभिमान संघटनेतर्फे १२ नोव्हेंबर रोजी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.
शेतकरी नापिकीमुळे मृत्यूला कवटाळत असताना विधानसभेत शेतकऱ्यांचे हे गहण प्रश्न मांडण्याऐवजी लोकप्रतिनिधी ड्रग्सप्रकरणी अटक केलेल्या आर्यन खानच्या मुद्द्यावर चर्चा करतात, हे कृषिप्रधान देशासाठी निंदनीय असल्याचे तुपकर म्हणाले. दरम्यान वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहेत, पण ते शेतकऱ्यांचा मुद्दा कधीच मांडत नाहीत, या प्रसार माध्यमांच्या प्रश्नावर तुपकर यांनी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे येत्या काही दिवसात यासंदर्भात अधिकृत घोषणा करतील, असे स्पष्ट केले.
यावेळी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड, अमित अढाऊ, रवि पडोळे, मंगेश फाटे, शैलेश ढोबळे, भगवंत वानखडे, अमोल महल्ले, श्याम अवथळे (बुलडाणा), दयाल राऊत (नागपूर), संकेत दुरकर, अरुण लाड, पुरुषोत्तम बन्सोड, प्रशांत शिरभाते, दिनेश आमले आदी उपस्थित होते.
दोन्ही सरकारला दखल घेण्यास भाग पाडू -
शेतकऱ्यांनी जिवाचे रान करून शेतीत घाम गाळला. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे लावलेला उत्पादनखर्चही निघू शकला नाही. परिणामी मृत्यूला कवटाळण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र, ज्याने आपल्यावर मरायची वेळ आणली त्याला मारायचे आहे. त्यासाठीच १२ नोव्हेंबर रोजी राज्यभरात आंदोलन उभारण्यात आले आहे. याची दखल केंद्र आणि राज्य सरकारला घेण्यास भाग पाडू, असे ठामपणे रविकांत तुपकर यावेळी म्हणाले.