धानोडी येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे चावडी वाचन
By admin | Published: January 11, 2015 10:43 PM2015-01-11T22:43:20+5:302015-01-11T22:43:20+5:30
खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून ३०२ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी १२५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. शासनाच्या मदतीवाचून कोणताही
चांदूररेल्वे : खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून ३०२ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यापैकी १२५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. शासनाच्या मदतीवाचून कोणताही शेतकरी वंचित राहाणार नाही याची जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी चावडी वाचनप्रसंगी दिली.
शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीची सर्व ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना माहिती व्हावी, सर्व पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील १९८१ गावांत चावडी वाचन करण्यात येत आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील धनोडी या गावी चावडी वाचन उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती किशोर झाडे, उप विभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसिलदार एकबाल अहेमद, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
शासनाकडून खरीप पिकासाठी हेक्टरी ४ हजार ५००, बागायतीसाठी ९ हजार रु.आणि फळबागांसाठी १२ हजार रुपये एक हेक्टरच्या मर्यादेत मदत वाटप करण्यात येत आहेत. ही रक्कम उद्या संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. मदत वाटपात दोष राहू नये, सर्वांना यादी पाहता यावी यासाठी ग्रामपंचायतमध्ये यादी लावण्यात येईल. यामध्ये लाभार्थ्यांचे क्षेत्र, बँक खाते क्रमांक रकमेचा तपशील राहणार आहे. यात ज्यांचे नाव नाही किंवा चुकीने दुसऱ्याचे नाव आले आहे. क्षेत्र कमी जास्त आले आहे, अशांनी चुकांची दुरुस्तीसाठी तक्रार करावी. येत्या ७ दिवसांत तक्रारींचे निराकरण करुन वाटपातील चुका दुरुस्त करण्यात येतील. नुकत्याच पडलेल्या थंडीमुळेही पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त झळकले आहेत. त्याबाबतही शासनस्तरावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे गित्ते यांनी सांगितले. हवामानातील बदलाची तसेच गारपीट, पावसाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, त्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये किंवा त्यांना पूर्वतयारी करता यावी, यासाठी कृषि विज्ञान केंद्राकडून प्रत्येक गावातील १० शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलद्वारे माहिती देण्यात येणार आहे. कोणत्या हंगामात कोणती पिके घ्यावीत, केंव्हा पेरणी करावी, अशी उपयुक्त माहिती पुरविण्यात येणार आहे. यावेळी सभापती किशोर झाडे यांचेही समयोचित भाषण झाले. प्रास्ताविक स्वप्निल देशमुख यांनी केले.