१६ वर्षांपूर्वी दुरावलेले दाम्पत्य नांदायला तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:01:23+5:30
लोक अदालतीत दाखल १६ प्रकरणांपैकी सात जणांची संसारे जुळवून ९ प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली. या लोकअदालतीत एकूण २१ प्रकरणे तडजोडीच्या सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रकरणांत संबधीत पक्षकारांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भांडणापेक्षा समझौता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा, असा संदेश देणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाने शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एक मोठी कामगिरी बजावली. तब्बल १६ वर्षांपूर्वी एकमेकांपासून दुरावलेल्या दाम्पत्याला एकत्रित आणून त्यांचा संसाराच्या प्रवाहात आणले.
लोक अदालतीत दाखल १६ प्रकरणांपैकी सात जणांची संसारे जुळवून ९ प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली. या लोकअदालतीत एकूण २१ प्रकरणे तडजोडीच्या सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रकरणांत संबधीत पक्षकारांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला. यापैकी सात प्रकरणांत संबंधित पक्षकारांचा संसार जुळविण्यात आल्याने ते एकत्रित संसार थाटण्यास तयार झाले. सदर लोकअदालतीत पॅनल जज एस.ए. सिन्हा, जिल्हा न्यायाधीश (८), सोनाली क्षीरसागर आणि कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक दीपाली देशमुख यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. या लोकअदालतीत विशेष म्हणजे, कौटुंबिक न्यायालयाने तडजोडीतील एका प्रकरणात मोलाची कामगिरी बजावली. कौटुंबिक वादातून एकमेकांपासून १६ वर्षांपूर्वी दुरावलेल्या दाम्पत्यांना एकत्रित आणले. या दाम्पत्यांना २० वर्षांचे अपत्य असून, त्या उभयतांनी आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याबद्दलचे प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. त्या दाम्पत्यांनी एकमेकांसोबत नांदण्याचा निर्णय घेतला. या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सहकार्य लाभले. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश इंद्रकला नंदा यांच्या मार्गदशनाखाली प्रबंधक रवींद्र फुकटे, सहायक अधीक्षक प्रदीप चोरे यांनी परिश्रम घेतले.