'वॉटर कप' स्पर्धेसाठी मेळघाटातील आदिवासी बांधव सज्ज
By admin | Published: February 20, 2017 12:11 AM2017-02-20T00:11:08+5:302017-02-20T00:11:08+5:30
पानी फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते 'वॉटरकप' स्पर्धेत मेळघाटातील धारणी तालुका पहिल्यांदाच सहभागी होत असून...
अमरावती : पानी फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते 'वॉटरकप' स्पर्धेत मेळघाटातील धारणी तालुका पहिल्यांदाच सहभागी होत असून सध्या या तालुक्यातील विविध गावांतील आदिवासी बांधव प्रशिक्षण घेऊन यंदाच्या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.
निसर्ग संरक्षण संस्थेच्या मेळघाट मधील हरिसालनजीक बोरी-कोठा रस्त्यालगत उभारलेल्या आदर्श अशा मुठवा समुदाय केंद्रात आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्यात आले. १६ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या शिबिरात १५ गावांमधून ५३ प्रशिक्षणार्थी सहभागी झालेत.
महाराष्ट्रातील पाणी टंचाई दूर करण्याच्या उद्देशाने सिनेअभिनेते आमीर खान व किरण राव यांनी सत्यमेव जयतेचे डायरेक्टर सत्यजित भटकळ, रीना दत्ता यांच्या मदतीने स्थापन केलेल्या 'पानी फाउंडेशन' या संस्थेने मागील वर्षी महाराष्ट्रातील १० तालुक्यांत जलसंधारणाची कामे करण्यात आलीत. यंदा वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वासाठी राज्यातील ३० तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. याद्वारे ३० हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये ही जलसंधारणाची लोक चळवळ राबविण्यात येत आहे.
हरिसालनजीकच्या निसर्ग संरक्षण संस्थेच्या मुठ्वा केंद्रावर प्रशिक्षण शिबिरांमध्ये शनिवारी प्रशिक्षणार्थिनी समतल चर खोदून स्पर्धेत तांत्रिक दृष्ट्या अचूक कामे कशी करायची याचे प्रात्यक्षिक केले. प्रशिक्षणार्थी शास्त्रशुद्ध प्रशिक्षणा सोबतच शिस्तीमध्ये, खेळीमेळीच्या वातावरणात अनेक उपयुक्त आणि नवनवीन गोष्टी शिकत आहेत. विविध गावांमधून आलेल्या आदिवासी बांधवांच्या एकमेकांशी नवीन ओळखी पण होत आहेत. प्रात:कालीन प्रार्थना, शिवार फेरी, पाणलोटा संबंधित वेगवेगळ्या फिल्म्स, त्यासंबंधित खेळ, श्रमदान असं सगळंच प्रशिक्षणार्थींना शिकायला आणि प्रत्यक्ष अनुभावायाला मिळत आहे.