पश्चिम विदर्भातील वास्तव : ६ महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी ओढला मृत्यूचा फास; अस्मानी, सुल्तानी संकटाचे रोज ३ बळी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: July 9, 2024 10:30 PM2024-07-09T22:30:38+5:302024-07-09T22:31:37+5:30
शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार असल्याची घोषणा दोन दशकापासून प्रत्येक राज्यकर्त्यांद्वारा करण्यात आलेली आहे.
अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहेत. यंदाच्या सहा महिन्यात म्हणजेच जून अखेर ५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये सर्वाधिक १७० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झालेल्या आहे. शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दरदिवशी तीन शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत.
दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारी, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे पश्चिम विदर्भात शेतकरी मृत्यूचा फास ओढत आहे. सन २००१ पासून राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रवण १४ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतल्या जात आहे. त्यानुसार अमरावती विभागात आतापर्यंत २०,६३० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ९,५१६ प्रकरणांमध्ये शासन मदत देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.
शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार असल्याची घोषणा दोन दशकापासून प्रत्येक राज्यकर्त्यांद्वारा करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात या गंभीर विषयाकडे शासन-प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शासन योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळत नाही. मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळणाऱ्या एक लाखांच्या शासन मदतीच्या निकषात १९ वर्षांपासून वाढ करण्यात आलेली नसल्याचे वास्तव आहे.
सन २००१ पासून विभागातील स्थिती
एकूण शेतकरी आत्महत्या : २०६३०
शासन मदत प्राप्त प्रकरणे : ९५१६
विविध कारणांनी नाकारली : १०६७६
चौकशीसाठी प्रलंबित प्रकरणे : ३०६
अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे. मात्र, याची कारणमीमांसा जिल्हा प्रशासनाने केलेली नाही. शेतकरी आत्महत्यांची क्लस्टर शोधून उपाययोजना राबविण्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, पुढे काही झालेच नाही. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या सहा महिन्यात १७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दर ३० तासात एक शेतकरी आत्महत्या होत असल्याची शोकांतिका आहे.
मार्च महिन्यात सर्वाधिक ११७ प्रकरणे
विभागात सहा महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक ११७ शेतकरी आत्महत्या मार्च महिन्यात झाल्या आहेत. जानेवारीत ९०, फेब्रुवारीमध्ये १००, एप्रिल ९६, मे ८४ व जून महिन्यात ७० शेतकरी आत्महत्या झाल्या. जूनअखेर अमरावती जिल्ह्यात १७०, यवतमाळ १५०, बुलढाणा १११, अकोला ९२ व वाशिम जिल्ह्यात ३४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.